सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:55 IST

परदेशात भारतीय गाड्यांना तुफान मागणी, सप्टेंबरच्या निर्यातीत मारुती सुझुकी जिम्नी पहिल्या क्रमांकावर

सप्टेंबर 2026 मधील कार निर्यातीचे आकडे समोर आले असून मारुती सुझुकी जिम्नीच्या 9124 युनिट्स परदेशात गेल्या आहेत.

परदेशात भारतीय गाड्यांना तुफान मागणी, सप्टेंबरच्या निर्यातीत मारुती सुझुकी जिम्नी पहिल्या क्रमांकावर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतात बनलेल्या गाड्यांची लोकप्रियता परदेशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताचा जागतिक दबदबा आणखी मजबूत होत आहे. सप्टेंबर 2026 मधील कार निर्यातीचे ताजे आकडे समोर आले असून त्यामुळे वाहन उद्योगाला सुखद धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मारुती सुझुकीच्या गाड्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. कंपनीची लोकप्रिय ऑफ-रोडर एसयूव्ही मारुती सुझुकी जिम्नी (Maruti Suzuki Jimny) निर्यातीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आली आहे.

सप्टेंबर 2026 मध्ये जिम्नीच्या तब्बल 9124 युनिट्स परदेशात पाठवल्या गेल्या. मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये हाच आकडा 6215 युनिट्स होता. म्हणजेच वर्षभरात जिम्नीच्या निर्यातीत 46.81 टक्क्यांची भक्कम वाढ नोंदवली गेली आहे. परदेशातील ग्राहकांमध्ये या एसयूव्हीच्या रफ-टफ लूकला आणि तिच्या क्षमतेला मोठी मागणी आहे.

जिम्नीमध्ये 1.5 लिटरचे K15B पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 104.8 bhp पॉवर आणि 134.2 Nm टॉर्क देते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत ऑल-व्हील ड्राईव्हचा (4WD) चांगला पर्यायही मिळतो.

निर्यातीच्या यादीत दुसरे स्थान मारुती सुझुकी फ्रोंक्सने (Fronx) 8771 युनिट्ससह टिकवून ठेवले आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात 24.22 टक्क्यांची काहीशी घट झाली आहे. तिसऱ्या स्थानावर मारुती सुझुकी डिझायर (Dzire) आहे. डिझायरच्या निर्यातीत 139.28 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आणि 8430 कार्स परदेशात गेल्या.

चौथ्या क्रमांकावर ह्युंदाई वरना (Hyundai Verna) असून तिच्या 6596 युनिट्स निर्यात झाल्या. त्यानंतर पाचव्या स्थानी ह्युंदाई आय10 निओस (1,945 युनिट्स), सहाव्या स्थानी मारुती स्विफ्ट (4530 युनिट्स) आणि सातव्या स्थानी ह्युंदाई ऑरा (4376 युनिट्स) आहे.

आठव्या स्थानावर फॉक्सवॅगन व्हर्टस (Volkswagen Virtus) असून तिच्या 3653 युनिट्स परदेशात गेल्या आणि निर्यातीत 45.25 टक्क्यांची वाढ झाली. सगळ्यात मोठी उडी मारुती सुझुकी अर्टिगाने (Ertiga) घेतली. 3525 युनिट्ससह ती नवव्या स्थानी पोहोचली आणि वर्षभरात तिच्या निर्यातीत 751.45 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली. दहाव्या क्रमांकावर 3319 युनिट्ससह निसान सनी (Nissan Sunny) आहे.

भारतात तयार होणाऱ्या या गाड्यांना परदेशी बाजारात वाढती मागणी आहे. ही गोष्ट भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या प्रगतीची साक्ष देणारी आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ