व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन स्वस्त होणार? MDR नंतर सरकारची TMR वर नजर, उपकरणांच्या नफ्याला चाप
महाराष्ट्र FDA च्या तपासात वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी किमतीत आणि MRP मध्ये मोठी तफावत आढळली, त्यानंतर आता ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन (TMR) वर चर्चा सुरू झाली आहे.
घरातलं कोणी हॉस्पिटलमध्ये अँडमिट असतं आणि डिस्चार्जच्या वेळी बिल हातात येतं, तेव्हा अनेकांच्या तोंडचं पाणी पळतं. औषधांसोबतच वेगवेगळं वैद्यकीय साहित्य वापरलं गेलं की बिलाचा आकडा एकदम वाढलेला दिसतो. पण एखादं वैद्यकीय उपकरण हॉस्पिटल किती किमतीला खरेदी करतं आणि तेच उपकरण रुग्णाकडून किती पैसे घेऊन दिलं जातं, याचा विचार फार कमी लोक करतात.
वैद्यकीय उपकरणांची खरेदी किंमत आणि रुग्णांकडून घेतली जाणारी रक्कम यात मोठी तफावत समोर आल्यानंतर ही चर्चा आणखी पेटली. यातूनच पुढे आलं ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन, म्हणजे TMR. अनेकांना TMR हा शब्द नवीन असेल किंवा नेमकं काय आहे हे माहीत नसेल.
TMR अंतर्गत अशी एक किंमत पद्धत आणण्याचा विचार सुरू आहे, जिच्यामुळे उपकरणाची खरेदी किंमत आणि रुग्णाकडून आकारली जाणारी रक्कम यातला मोठा फरक कमी होईल. उदाहरण द्यायचं झालं तर, एखादं उपकरण हॉस्पिटलला १०० रुपयांना मिळालं आणि तेच रुग्णाकडून ४०० रुपये घेऊन दिलं जात असेल, तर हा फरक कमी करण्यावर TMR चं लक्ष असेल. यावर सध्या चर्चा सुरू आहे, अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
महाराष्ट्र FDA नं केलेल्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. काही वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी किमतीत आणि MRP मध्ये मोठी तफावत असल्याचं या तपासात उघड झालं.
सरकार वैद्यकीय उपकरणांवर नेमकं किती मार्जिन ठरवणार, याबद्दल अजून काहीही निश्चित झालेलं नाही. त्यावरही चर्चा सुरू आहे.
याच सर्वेक्षणात आणखी काही आकडे समोर आले. वैद्यकीय उत्पादनांवर १५० टक्क्यांपासून तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंत नफा कमावला जात असल्याचं यात दिसून आलं. एक कॅथेटर हॉस्पिटलनं २९.४१ रुपयांना खरेदी केला आणि रुग्णाकडून ३१० रुपये घेतले. एक सिरिंज ६.७५ रुपयांना घेतली आणि रुग्णाकडून ५७.२० रुपये आकारले. एक नेब्युलायझर किंवा ऑक्सिजन मास्क ४० ते ४५ रुपयांना खरेदी केला आणि रुग्णाकडून त्यासाठी ६५० ते ७१५ रुपये घेतले. आयव्ही इन्फ्युजन सेट ११.०५ रुपयांना घेतला आणि रुग्णाकडून ३२५ रुपये आकारले.
यावर हॉस्पिटलचं म्हणणं आहे की, उपकरण खरेदीची किंमत आणि रुग्णाकडून घेतली जाणारी रक्कम यातल्या फरकातून त्यांना नफा मिळत नाही. यंत्रसामग्री, स्वच्छता, रुग्णांची सुरक्षा, आपत्कालीन सेवा आणि कर्मचारीवर्ग यासाठी इतरही अनेक खर्च करावे लागतात, असंही हॉस्पिटलचं म्हणणं आहे. उत्पादनाची MRP उत्पादन करणारी कंपनी ठरवते, हे हॉस्पिटलनं स्पष्ट केलं आहे.
TMR लागू झाला तर वैद्यकीय साहित्याची पुरवठा किंमत किती आहे आणि हॉस्पिटल त्यासाठी रुग्णाकडून सध्या किती शुल्क घेतं, याचा विचार त्यात केला जाईल आणि दोन्हींमधली तफावत कमी करण्याचा प्रयत्न होईल.