सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 17:20 IST

कारंजात किराणा विक्रेत्याचा अल्पवयीन मुलीवर तीन वर्षे अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड, आरोपी फरार

वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात ४५ वर्षांच्या किराणा विक्रेत्याने ओळखीतील अल्पवयीन मुलीवर कॉल रेकॉर्डिंगची धमकी देऊन तीन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी प्रफुल्ल साखरकर फरार झाला आहे.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात माणुसकीला काळीमा फासणारी, अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षांच्या किराणा विक्रेत्याने आपल्याच ओळखीतील अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तब्बल तीन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव प्रफुल्ल साखरकर (वय ४५, रा. कारंजा) असे आहे. तो पेशाने किराणा विक्रेता आहे. कुटुंबाची ओळख होती आणि त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने अल्पवयीन मुलीची एक कॉल रेकॉर्डिंग स्वतःकडे ठेवली होती.

ती क्लिप सार्वजनिक करण्याची आणि नातेवाइकांना ऐकवण्याची धमकी देऊन आरोपी एप्रिल २०२३ ते जून २०२६ या सुमारे तीन वर्षांच्या काळात तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करत राहिला, असे पोलिसांनी सांगितले. या सततच्या अत्याचारांमुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.

ही गोष्ट लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने कारंजा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.

पीडितेच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी प्रफुल्ल साखरकर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी शहर सोडून पसार झाला. सध्या तो फरार आहे. वाशीमच्या प्रभारी पोलीस अधीक्षक लता फड यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. फरार आरोपीला अटक करण्यासाठी त्यांनी विशेष पोलीस पथके रवाना केली आहेत. कारंजा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ