Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर, ६५०० हून अधिक जवान तैनात; CCTV आणि ड्रोनने देखरेख
वसई-विरारमध्ये अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाने साडेसहा हजार जणांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
बारा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर गणरायाला निरोप देण्याची वेळ वसई-विरारमध्ये आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी वसई-विरार महापालिका आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. महापालिकेचे चार हजारांहून जास्त कर्मचारी आणि पोलिसांचे अडीच हजारांहून जास्त जवान असे मिळून तब्बल साडेसहा हजार जणांचा बंदोबस्त शहरभर तैनात करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पोलिस रस्त्यावर उतरवण्यामागचा उद्देश म्हणजे मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाची प्रक्रिया विनाअडथळा पार पडावी हा आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देत पालिकेने यंदा शहरात १२८ कृत्रिम तलाव आणि १८ फिरते हौद उभारले असून दोन खदानींच्या ठिकाणी कन्वेअर बेल्टची सोय केली आहे. यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळता येईल आणि भाविकांना जवळच्या ठिकाणी विसर्जनाची सुविधा मिळेल. मोठ्या मूर्ती सुरक्षितपणे विसर्जित करता याव्यात यासाठी सहा मुख्य जेट्टींवर तराफे आणि बोटी तयार ठेवण्यात आल्या आहेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे वसई आणि विरार मारंबळपाडा जेट्टीवर 'रो-रो' सेवा सुरू करण्यात आली असून भाविकांना मदत करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तिथे हजर राहतील. विसर्जन घाटांवरील पाणी खराब होऊ नये आणि जलप्रदूषण रोखलं जावं म्हणून ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.
विसर्जन स्थळांची नेमकी माहिती भाविकांना सहज मिळावी यासाठी प्रशासनाने 'क्यूआर कोड'ची सोय उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून भाविकांना जवळच्या विसर्जन स्थळापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. अग्निशमन दलाचे जवान, जीवरक्षक, लाइफ जॅकेट्स, रेस्क्यू बोटी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने विसर्जन स्थळांवर बारीक नजर ठेवली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.
मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या किंवा महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस पथकं गस्त घालणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर आणि आवाजाच्या प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी वेगळी पथकं नेमली आहेत. मंडळांनी भरती-ओहोटीच्या वेळा सांभाळून विसर्जन ठरलेल्या वेळेत उरकावं आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांवर घातलेले निर्बंध पाळावेत, असं आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंत्रे यांनी केलं आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत ६४३ सार्वजनिक आणि ५ हजार ३३० घरगुती अशा एकूण ५ हजार ९७३ गणेशमूर्तींचं विसर्जन होणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ६ पोलिस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलिस आयुक्त, २०४ अधिकारी, १ हजार ३८१ अंमलदार, ३०० होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १९२ जवान रस्त्यावर उतरणार आहेत. याशिवाय एसआरपीएफच्या ३ प्लाटून, आरसीपीची १ प्लाटून आणि २ स्ट्रायकिंग फोर्सही तैनात करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करून वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक कुठलाही अडथळा न येता पार पाडण्याचा निर्धार केला आहे.