गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वरोरा : महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

वरोरा : महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

वरोरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २०२१ च्या गुन्ह्यात आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.

चंद्रपूर : वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०२१ मध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा निकाल लागला आहे. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या खटल्यात वरोरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेसोबतच दंडाची शिक्षाही न्यायालयाने दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार २९ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साधारण सात वाजून पंधरा मिनिटे ते आठ वाजेच्या दरम्यान घडला. फिर्यादी महिला त्या वेळी आरोपीसोबत फोरव्हीलर गाडीतून आपल्या गावी निघाली होती. खैरी येथून तिच्या गावाकडे जाण्याऐवजी आरोपीने गाडी माढेळीच्या रस्त्याला वळवली, असे तपासात समोर आले. नागरी माढेळीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गाडी नेऊन त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, तिला मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप होता.

महिलेने तक्रार दिल्यानंतर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५३/२०२१ नुसार भादवि कलम ३७६, ३७६(२)(एन)(इ), ३२३ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला तातडीने अटक करण्यात आली होती.

गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने वरोरा पोलिसांनी याचा बारकाईने तपास केला. तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाशी संबंधित प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आणि वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अतुल के. शहा यांच्या न्यायालयात चालला.

सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ॲड. गोविंद उराडे यांनी मांडली. त्यांनी सादर केलेले साक्षीपुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम निकाल दिला.

शिक्षेचा तपशील असा : कलम ३७६(२)(एन) अंतर्गत आरोपीला जन्मठेप आणि ५,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. हा दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल. कलम ३७६ अन्वये सात वर्षांची शिक्षा आणि ४,००० रुपये दंड झाला आहे. कलम ३२३ अन्वये एक वर्षाची शिक्षा आणि १,००० रुपये दंड, तर कलम ५०६ अन्वये एक वर्षाची शिक्षा आणि १,००० रुपये दंड सुनावण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्ह्याचा सखोल तपास वरोरा पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी केला. सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. गोविंद उराडे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून वरोरा पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार धनराज करकाडे यांनी आणि चंद्रपूरच्या दोषसिद्धी कक्षानेही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ