वर्ल्ड हार्ट डे: सामान्य रेंजपेक्षा स्वतःचं LDL-C लक्ष्य माहित असणं का गरजेचं
कोलेस्ट्रॉलचा आकडा माहित असणं पुरेसं नाही, स्वतःचं वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य किती हवं हे कार्डिओलॉजिस्ट का महत्त्वाचं मानतात, वाचा सविस्तर.
कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट नॉर्मल आला की बहुतेक जण निश्चिंत होतात. पण डॉक्टर सांगतात की हे पुरेसं नाही, कारण प्रत्येकाचं स्वतःचं एलडीएल-सी लक्ष्य वेगळं असतं. ३४ वर्षांच्या विक्रम देसाई यांचं उदाहरण हेच दाखवतं. वार्षिक तपासणीत त्यांची कोलेस्ट्रॉल पातळी मर्यादेत होती, आणि आपली लाईफस्टाईल तंदुरुस्त व अॅक्टिव्ह असल्याने सगळं ठीक आहे असं त्यांना वाटलं. पण डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांना कळलं की लॅब रिपोर्ट फक्त जनरल माहिती देतो, प्रत्यक्षात कौटुंबिक इतिहास किंवा डायबिटीससारखे वैयक्तिक रिस्क फॅक्टर हेच खरं लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल-सी चं लक्ष्य ठरवतात.
विक्रम यांची केस ही भारतातल्या शहरांमध्ये आता कॉमन झालेली गोष्ट आहे. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७.८ टक्के मृत्यू हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होतात, आणि देशातल्या ३१ टक्के लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली आढळते. पाश्चिमात्य देशांतल्या लोकांच्या तुलनेत भारतीयांना हृदयाशी संबंधित आजार १० ते १५ वर्षं आधीच होतात. अनेकांना त्यांचा एकूण कोलेस्ट्रॉलचा आकडा माहित असतो, पण स्वतःचं वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य नेमकं किती असावं हे फार कमी जणांना माहित असतं.
उच्च एलडीएल-सीला डॉक्टर अनेकदा "सायलेंट किलर" म्हणतात, कारण कोणतंही लक्षण न दाखवता ते हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर म्हणजे प्लाक जमा करत राहतं. या स्थितीला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे महत्त्वाच्या अवयवांकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो, आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका वाढतो. तरुण असणं, फिट असणं किंवा वजन कंट्रोलमध्ये असणं याचा अर्थ एलडीएल-सी अपेक्षित मर्यादेत आहेच असा होत नाही.
यासाठी लहान वयातच तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे सीएसआयने वयाच्या अठराव्या वर्षापासून लिपिड प्रोफाइल तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. वेळेत केलेल्या तपासणीमुळे समस्या गंभीर होण्याआधीच लक्षात येऊ शकते. दिसायला हेल्दी वाटणाऱ्या व्यक्तीमध्येही उच्च एलडीएल-सी असू शकतं, त्यामुळे नियमित तपासणी टाळू नये असं डॉक्टर सांगतात.
मुंबईतल्या सैफी हॉस्पिटलमधले कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निमित शाह यांनी सांगितलं की, "लवकर निदान म्हणजे फक्त आकडेवारी तपासणं नाही. एलडीएल-सीचं लक्ष्य प्रत्येकासाठी वेगळं असतं आणि सगळ्यांसाठी एकच पद्धत लागू होत नाही. प्रत्येकाचं वय, कौटुंबिक इतिहास आणि डायबिटीस किंवा उच्च रक्तदाबासारखे इतर आजार यांसारखे स्वतंत्र रिस्क फॅक्टर असतात, ज्यावरून एलडीएल-सी पातळी ठरते. ही पातळी मर्यादेत राखणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला पाळणं, स्वतःच्या तब्येतीबद्दल माहिती ठेवणं आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याच्या या प्रवासात स्वतः लक्ष देणं महत्त्वाचं आहे."
पुढच्या वेळी तपासणीला गेल्यावर डॉक्टरांना हे तीन प्रश्न विचारून स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असं सुचवलं जातं: आज माझी एलडीएल-सी पातळी किती आहे, माझं वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य काय असायला हवं, आणि माझी सध्याची पातळी त्या लक्ष्याप्रमाणे मर्यादेत आहे का, नसल्यास माझ्यासाठी कोणते पर्याय आहेत.
संतुलित आहार, तणाव कमी ठेवणं आणि नियमित व्यायाम यासारखे लाईफस्टाईलमधले बदल हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. तरीही केवळ हे बदल एलडीएल-सी नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे ठरतीलच असं नाही. अशा वेळी लिपिड कमी करणारी औषधं गरजेची ठरतात आणि ती दीर्घकाळ नियमितपणे घेणं आवश्यक असतं.