विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना दाखले आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वर्ध्यात विशेष शिबिरे
सेवा संकल्प अभियानांतर्गत एकही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, अशी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे विभागांना निर्देश.
वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना जात, उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्रासह गरजेचे दाखले मिळावेत, यासाठी विशेष शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांतून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले. एकही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले.
आर्वी तालुक्यातील धनोडी येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप झाले. नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
याच वेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी धनोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला भेट दिली. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा पाणीपुरवठा, आहार, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा यांची पाहणी करून त्यांनी तिथल्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणींवर उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाला भेट दिली. तिथे आर्वी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा आढावा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. कामाची गती वाढवून ते लवकर पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आर्वी तालुक्यातील बहादुरपूर (खुबगाव) येथील देवराव पांडूजी कांबळे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी बोलून त्यांनी कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांची सध्याची स्थिती तसेच पाण्याची उपलब्धता याविषयीची माहिती घेतली.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे उत्पन्न सरासरीपेक्षा खूपच कमी झाले असल्याचेही शेतकरी म्हणाले.
या संपूर्ण दौऱ्यात उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, गटविकास अधिकारी शिवशंकर इंगोले, तालुका कृषी अधिकारी रविंद्र उघडे, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि इतर जण उपस्थित होते.