वाढवण बंदराच्या कामांना गती, केंद्रीय सचिव विजय कुमार यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण प्रकल्पाला भेट देऊन कामांचा आढावा घेतला आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले.
पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी वाढवण ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी आता केंद्रीय पातळीवरून थेट हालचाली सुरू झाल्या आहेत. भारत सरकारच्या बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार यांनी प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली. मैदानावर सुरू असलेल्या विविध कामांची त्यांनी सविस्तर पाहणी केली आणि विकासकामांच्या सध्याच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड म्हणजेच व्हीपीपीएलमार्फत हे बंदर आकाराला येत आहे. या बंदराच्या प्राथमिक कामांनी आता वेग घेतला आहे, आणि त्याच टप्प्यावर केंद्रीय सचिवांचा हा दौरा झाला.
भेटीदरम्यान विजय कुमार यांनी किनाऱ्यालगतच्या समुद्रातील भरावाचे काम तपासले. समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ब्रेकवॉटरची उभारणी, बंदराला जोडणारे बाहेरचे दळणवळणाचे महामार्ग आणि रेल्वे जाळे, भूसंपादनाची प्रक्रिया तसेच वीज-पाण्यासारख्या पायाभूत सेवा, या सगळ्यांची प्रगतीही त्यांनी बारकाईने तपासली.
आगामी टप्प्यांमध्ये कोणती कामे ठरली आहेत, याची रूपरेषा व्हीपीपीएलच्या तांत्रिक पथकाने त्यांच्यासमोर सादर केली. प्रकल्पाची अंमलबजावणी ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण व्हायची असेल, तर सर्व संबंधित शासकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि भागधारक यांच्यात घनिष्ठ समन्वय असणे अत्यावश्यक आहे, असे विजय कुमार यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाची इतर पूरक कामे एकाच वेळी समांतरपणे पुढे नेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बांधकामाचा व्यापक टप्पा सुरू करण्यापूर्वी कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण राहता कामा नये, या दृष्टीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचीही त्यांनी खातरजमा केली. या दौऱ्यात त्यांनी विविध भागधारकांशी थेट संवाद साधला.
व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल म्हणाले, "केंद्रीय सचिवांच्या या महत्वपूर्ण दौऱ्यामुळे आणि त्यांनी घेतलेल्या सविस्तर आढाव्यामुळे वाढवण प्रकल्पाच्या कामांना निश्चितच नवी गती मिळेल. प्रकल्पाचे प्रत्येक काम पूर्वयोजनेनुसार वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाचे तांत्रिक निकष, पर्यावरणीय शाश्वतता आणि कार्यान्वयनाची सज्जता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे."
पाहणी दौऱ्यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल उपस्थित होते. पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि व्हीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविश कुमार सिंह हेही होते. त्यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी या वेळी हजर होते.