UPSC परीक्षेशिवायही LBSNAA मध्ये प्रवेशाची संधी, जाणून घ्या मसुरी कॅम्पसमधल्या वेगळ्या वाटा
मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत जाण्यासाठी यूपीएससी परीक्षा पास होणं ही एकच वाट नाही. इंटर्नशिप, मिड-करियर ट्रेनिंग आणि शैक्षणिक दौऱ्यांच्या माध्यमातूनही या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळू शकतो.
मसुरीच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये असलेल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी म्हणजे LBSNAA चं नाव घेतलं की डोळ्यांसमोर लगेच ट्रेनिंग घेणारे आयएएस-आयपीएस अधिकारी येतात. दरवर्षी लाखो तरुण यूपीएससीची अवघड परीक्षा पास करून याच कॅम्पसमध्ये पोहोचायचं स्वप्न बघतात. पण यूपीएससी पास न होताही या नामांकित संस्थेत जाता येतं, हे फार कमी जणांना माहीत आहे. ऐकायला जरा विचित्र वाटलं तरी हे खरं आहे.
बऱ्याच जणांना वाटतं की LBSNAA मध्ये फक्त सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवडलेले ट्रेनी अधिकारीच जाऊ शकतात. पण खरी परिस्थिती याच्या नेमकी उलट आहे. हा कॅम्पस केवळ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगचं ठिकाण नाही, तर देशातल्या सर्वात मोठ्या वैचारिक आणि प्रशासनिक विचारमंथनाचं केंद्र आहे. इथे वेगवेगळे कार्यक्रम चालवले जातात, ज्यांच्या माध्यमातून यूपीएससी पास न होताही प्रवेश मिळू शकतो.
यातला पहिला मार्ग म्हणजे इंटर्नशिप. यूपीएससी पास केलं नसलं तरी LBSNAA च्या आतल्या वातावरणाचा जवळून अनुभव घेण्यासाठी इंटर्नशिप हा सर्वात चांगला पर्याय आहे. LBSNAA च्या नॅशनल सेंटर फॉर लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे NCLA नं फायनल इयरला असणाऱ्या लॉ विद्यार्थ्यांसाठी चार आठवड्यांची अकॅडमिक इंटर्नशिप सुरू केली आहे. यातून देशातल्या टॉप प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आणि फॅकल्टीसोबत गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉवर संशोधन करण्याची संधी मिळते. याशिवाय पब्लिक पॉलिसी, सोशल सायन्सेस, मीडिया आणि रिसर्च या क्षेत्रातल्या तरुणांसाठीही वेगवेगळ्या सेंटर्समधून प्रोजेक्ट बेस्ड इंटर्नशिपचे दरवाजे उघडे असतात.
दुसरा मार्ग आहे मिड-करियर ट्रेनिंग प्रोग्राम्सचा. देशातल्या वेगवेगळ्या केंद्रीय सेवांमधले म्हणजे IRS, IPS, IFoS अशा सेवांमधले सीनियर अधिकारी आणि राज्य सिव्हिल सर्व्हिसेसमधले (State PCS) अनुभवी अधिकारी यांना रिफ्रेशर कोर्ससाठी मसुरीला पाठवलं जातं. याशिवाय देशातल्या आणि परदेशातल्या मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या तज्ज्ञांना गेस्ट लेक्चरर, कन्सल्टंट किंवा रिसर्चर म्हणून इथे बोलावलं जातं.
तिसरा मार्ग म्हणजे शैक्षणिक दौरे. सामान्य लोक LBSNAA मध्ये फिरायला जाऊ शकतात का, असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो. हे कोणतं साधं पर्यटन स्थळ नसल्यामुळे इथे थेट एंट्री बंद आहे. पण निवडक विद्यापीठं आणि संशोधन संस्थांमधले विद्यार्थी एज्युकेशनल टूरच्या माध्यमातून खास परवानगी घेऊन इथे भेट देऊ शकतात. LBSNAA ही साधी इमारत नाही, तर ज्ञानाचं मंदिर आहे, आणि आपल्या कौशल्याच्या आणि पात्रतेच्या जोरावर या निवडक वाटांनी इथे प्रवेश मिळवता येतो.