आधारवड गौरवग्रंथ नव्या पिढीला प्रेरणा देईल, प्रतापराव भोसलेंबद्दल उल्हास पवार
वाई येथे स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनकार्यावरील 'आधारवड' गौरवग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते झाले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वाई : तत्त्वाला धरून राहणे, पक्षाशी इमान राखणे, मैत्री निभावणे आणि दिलेला शब्द पाळणे, ही स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा 'आधारवड' हा गौरवग्रंथ म्हणजे मूल्यनिष्ठ राजकारणाचा वारसा सांगणारा दस्तऐवज आहे आणि तो नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देईल, असे विधानपरिषदेचे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितले.
जनता शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, तसेच माजी खासदार स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन उल्हासदादा पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय कुवळेकर यांनी भूषवले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले, संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्रा. नारायण चौधरी आणि प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले की, प्रतापराव भोसले यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी भरलेले होते. त्यांचे औपचारिक शिक्षण मर्यादित होते, तरी त्यांची समज एखाद्या निष्णात वकिलालाही लाजवेल अशी होती. मैत्री कशी निभवायची, दिलेला शब्द कसा पाळायचा आणि पक्षाशी निष्ठा कशी ठेवायची, याचा आदर्श त्यांनी स्वतःच्या वागण्यातून घालून दिला. संसदेत असो किंवा सार्वजनिक जीवनात, त्यांनी आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. त्यांची मूल्ये आणि काम करण्याची पद्धत आजही दिशा दाखवणारी आहे. हा गौरवग्रंथ भाऊंच्या कामाची व्याप्ती दाखवतो आणि त्यांचे विचार व कर्तृत्व पुढच्या पिढीला समजावून देणारा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात विजय कुवळेकर म्हणाले की, प्रतापराव भोसले यांच्या राजकारणाचा काळ वेगळा होता. तेव्हा राजकीय विरोध असला, तरी तो मुख्यतः तत्त्वांवर आधारलेला असायचा. आज राजकारण आणि समाजकारणाचे रंग बदलले आहेत आणि माणसांची रूपेही बदलली आहेत. अशा काळात भाऊंसारख्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व जास्त जाणवते. 'तत्त्व' आणि 'तत्त्वनिष्ठा' हे शब्द दुर्मिळ होत चालले असताना भाऊंच्या जीवनावर गौरवग्रंथ प्रसिद्ध होणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
उच्च शिक्षण पदवी देते, पण संस्कार देईलच असे नाही, असे सांगून कुवळेकर पुढे म्हणाले की, भाऊंची नाळ शेती आणि मातीशी जोडलेली होती. जो स्वच्छ असतो तो परखड असतो, पण गरज असेल तिथे संवेदनशीलताही जपतो. परखडपणा आणि संवेदनशीलता यांचा सुंदर मेळ भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात होता. स्वतःच्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धावपळ करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. जीवनाकडे पाहण्याची त्यांची नजर सकारात्मक आणि आनंदी होती. अडचणींपासून पळ काढण्याऐवजी त्यांना तोंड देण्याची वृत्ती त्यांच्यात होती. आजची राजकीय परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यातील पिढीला भाऊंसारखी व्यक्ती खरोखर होऊन गेली होती का, असा प्रश्न पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.
भाऊ म्हणजे परिपूर्णतेचे अनेक पैलू एकत्र अनुभवायला देणारे व्यक्तिमत्त्व होते, असे सांगून कुवळेकर म्हणाले की, 'आधारवड' हा ग्रंथ फक्त आठवणींचा संग्रह नाही, तर मूल्यनिष्ठेचे फळ आहे. तत्त्वांची, विचारांची आणि तेजाची पेरणी करणारा हा ग्रंथ आहे. तो राज्यातील सर्व ग्रंथालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले की, भाऊंचे व्यक्तिमत्त्व शब्दांत मांडणे कठीण आहे, कारण ते समजण्याच्या पलीकडचे होते. यशवंतराव चव्हाण साहेब आणि किसन वीर आबा यांच्याबद्दल त्यांच्या मनात कायम कृतज्ञतेची भावना होती. हाती घेतलेले काम जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जीवनकार्याचा दस्तऐवज तयार करताना संपादकांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत, असेही ते म्हणाले. गौरवग्रंथाचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. शिवाजी कांबळे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.