गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:22 IST

वाईच्या कृष्णाकाठच्या जुन्या घाटांची कामात मोडतोड, गायब झालेला पार शोधण्याची मागणी

सांडपाणी आणि पदपथाच्या कामांमध्ये ब्राह्मणशाही व रामडोह आळीतील घाटांचे चिरे, पार आणि पायऱ्या खराब झाल्याने वाईकर संतप्त आहेत.

वाईच्या कृष्णाकाठच्या जुन्या घाटांची कामात मोडतोड, गायब झालेला पार शोधण्याची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

वाई शहराच्या कृष्णा नदीकाठी असलेल्या जुन्या घाटांचे मूळ रूपच सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे धोक्यात आले आहे. शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृतीचा वारसा या घाटांनी जपला आहे. आता शहरात सांडपाणी व्यवस्था आणि पदपथाची कामे चालू आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचे दिसते. ब्राह्मणशाही रामडोह आळी घाटावरील अनेक रेखीव चिरे गायब झाले आहेत. या सगळ्या प्रकाराबद्दल वाईकरांमध्ये तीव्र संताप आहे.

वाई हे ऐतिहासिक शहर आहे. इथे अनेक जुनी मंदिरे आणि घाट आहेत. शहराजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावर काशीविश्वेश्वर, महा गणपती यांच्यासह अनेक मंदिरे आणि चिरेबंदी घाट आहेत. हे घाट म्हणजे राज्याचे भूषण आहेत, असे इथले लोक म्हणतात. सध्या नगरपालिकेतर्फे या घाटांच्या शेजारी सांडपाणी व्यवस्था आणि पदपथाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे करताना अनेक ठिकाणी जुन्या बांधकामाला धक्का लागला आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदार नियोजनामुळे घाटांच्या वारसास्थळाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ब्राह्मणशाही घाटावर पूर्वी भाविक आणि पर्यटकांना विसावा घेण्यासाठी चार दगडी पार होते. त्यांची मोडतोड झाली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी पत्रे पाठवून हे पार पूर्वीसारखे करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने तसे आश्वासन दिल्याचे नागरिक सांगतात. प्रत्यक्षात आज चारपैकी एक पार पूर्णपणे गायब आहे, तर बाकीचे तीन पार भग्न अवस्थेत पडले आहेत. हे पार कोणी हटवले आणि गायब झालेला पार गेला कुठे, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

रामडोह आळीतील ऐतिहासिक पायऱ्यांचीही या कामांमध्ये मोठी वाताहत झाली आहे. कोजागरी पौर्णिमेला इथे दीपप्रज्वलन होते आणि पारंपरिक गणेश विसर्जनाचा मार्गही हाच आहे. दगड विस्कटले आहेत आणि सिमेंट व फरशीचा गरजेपेक्षा जास्त वापर झाल्यामुळे घाटांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे, असा आरोप होत आहे.

पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेता आणि कोणतेही सर्वेक्षण न करता हे काम सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विकासकामांबाबत मागणी जोर धरत आहे. वाईचा विकास जरूर व्हावा, पण समृद्ध इतिहासाची मोडतोड करून नको, अशी ठाम भूमिका वाईकरांनी घेतली आहे. गायब पार तातडीने शोधावा आणि नुकसान झालेली सर्व बांधकामे मूळ दगडी पद्धतीतच पूर्ववत करावीत, नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कृष्णाबाई संस्थान घाट, ब्राह्मणशाही, वाई येथील सरपंच श्रेयस खटावकर म्हणाले की, पदपथ आणि इतर कामे करताना पालिकेने ब्राह्मणशाही आणि रामडोह आळी येथील जुने ऐतिहासिक पार आणि दगडी पायऱ्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक बांधकामाचे नुकसान झाले आहे. ही तोडफोड तातडीने दुरुस्त करून द्यावी, यासाठी पालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, असे त्यांनी सांगितले.

वाईच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले की, ब्राह्मणशाही आणि रामडोह आळी भागात पदपथ आणि सांडपाणी व्यवस्थेची कामे सुरू आहेत. या कामांच्या वेळी जुन्या ऐतिहासिक बांधकामाला थोडी हानी पोहोचली आहे. मात्र ठेकेदाराला हे बांधकाम पूर्ववत करण्याची अट घातलेली आहे. त्याच्याकडून हे काम लवकरच पूर्ण करून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ