ट्रान्सरेलच्या संचालक मंडळाची एनओपीएलमधील ४९ टक्के हिश्शाला मंजुरी; महाराष्ट्रात ३,९०० कोटींचा सौर प्रकल्प
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडच्या संचालक मंडळाने एनओपीएल पेस ग्रीन एनर्जीमधील ४९ टक्के इक्विटी हिस्सा २० कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात संपादित करण्यास मंजुरी दिली आहे.
पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) क्षेत्रात अग्रणी असलेल्या ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने एका महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव एनओपीएल पेस ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (एनओपीएल) या कंपनीतील ४९ टक्के इक्विटी हिस्सा संपादित करण्याचा आहे.
हे संपादन २० कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात होणार आहे. मात्र आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर आणि अटींची पूर्तता झाल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण होईल.
एनओपीएल सध्या भारत सरकारच्या पीएम-कुसुम योजनेच्या कंपोनंट सी अंतर्गत महाराष्ट्रात सुमारे ९९० मेगावॅट (एसी) क्षमतेचा मोठा सौर ऊर्जा पोर्टफोलिओ विकसित करत आहे. महाराष्ट्रातील कृषी फीडर्सचे सौरिकीकरण करणे आणि राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंड व हरित वीज उपलब्ध करून देणे, हे या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
हा प्रकल्प सुमारे ३,९०० कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (एमएसईडीसीएल, म्हणजे महावितरण) यांच्यासोबत २५ वर्षांचा पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट करण्यात आला आहे. या करारानुसार वीज प्रति युनिट ३.१० रुपये या निश्चित दराने घेतली जाईल. शिवाय एका नामांकित आर्थिक संस्थेकडून या प्रकल्पासाठी कर्जमंजुरीही मिळाली आहे.
ओनिक्स रिन्युएबल लिमिटेडसोबत झालेल्या करारांनुसार ट्रान्सरेलला सुरुवातीला ४९% इक्विटी हिस्सेदारी मिळेल. या हिश्शासोबतच प्रकल्पाचे आर्थिक आणि व्यवस्थापन नियंत्रणही ट्रान्सरेलकडे येईल. पुढे परस्पर मान्य अटींनुसार ही हिस्सेदारी १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा पर्यायही ट्रान्सरेलकडे असेल.
या धोरणात्मक विस्ताराबद्दल माहिती देताना ट्रान्सरेलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ रणदीप नारंग म्हणाले, "केवळ एक ईपीसी कंपनी असण्यापासून 'इंटेग्रेटेड एनर्जी सोल्युशन्स प्रोव्हायडर' बनण्याच्या आमच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे ट्रान्समिशन उत्पादनांच्या निर्मितीसोबतच, वीज निर्मिती ते ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन अशा संपूर्ण ऊर्जा व्हॅल्यू चेनमध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळेल. हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज पुरवून सिंचन सुलभ करेल. या प्रकल्पामुळे कंपनीला स्थिर, दीर्घकालीन महसूल आणि नफा मिळेल, ज्यामुळे आमच्या एकूण विकासाला अधिक गती मिळेल."
हा प्रकल्प ट्रान्सरेलला ईपीसी व्यवसायाच्या पलीकडे जाऊन अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात विस्तार करण्यास मदत करेल. तसेच दीर्घकालीन नियमित उत्पन्न मिळवण्यासाठीही हा प्रकल्प उपयोगी ठरेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.