बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

कर्जतमध्ये तोडलेल्या जंगलाची जरांगे पाटील यांच्याकडून पाहणी; सरकारला इशारा

कर्जतमध्ये तोडलेल्या जंगलाची जरांगे पाटील यांच्याकडून पाहणी; सरकारला इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

टोरंट प्रकल्पावरून सरकारवर टीका होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी कर्जतमधील सायडोंगर येथे तोडलेल्या जंगलाची पाहणी केली आणि स्थानिकांशी संवाद साधला.

टोरंट धरण प्रकल्पावरून राज्यभर सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री आणि सत्ताधारी मात्र या प्रकल्पाची भलावण करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत येथील पाली तर्फे कोतवाल खलाटी मधील सायडोंगर येथे तोडलेल्या जंगलाची पाहणी केली. तिथे स्थानिकांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

जरांगे पाटील अहिल्याननगर येथून सकाळी कर्जतला पोहोचले. कर्जतमध्ये त्यांचे जोरदार स्वागत झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर ते पाली सायडोंगर येथे गेले. त्यावेळी कर्जत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

तोडलेले जंगल पाहिल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला कोणता पर्यावरणपूरक विकास करायचा आहे, हे सरकारने इथे येऊन स्थानिक शेतकरी आणि आदिवासी लोकांशी बोलले पाहिजे आणि त्यांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. पंतप्रधानांनी जनतेवर वार करण्याचे आणि जनतेला गृहीत धरून धक्के देण्याचे थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

स्थानिकांना झाडे तोडायची नाहीत, हे मुख्यमंत्र्यांनी ऐकले पाहिजे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. जनतेला प्रकल्प नको असेल, तर तो इथून दुसरीकडे नेला पाहिजे, असे ते म्हणाले. जंगल संपवण्याचा घाट रद्द केला पाहिजे आणि सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट तिथून हलवला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. तसे झाले नाही तर आपण इथल्या जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहोत, आणि गरज भासली तर संपूर्ण महाराष्ट्र इथे आणून उभा करू, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले.

सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा ठेका घेणाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे सामर्थ्य महाराष्ट्राच्या मातीत आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रप्रेमी लोकांची परीक्षा पाहू नये, असे आवाहन त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले. मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरणपूरक प्रकल्पाची खिल्ली उडवताना, त्यांना आता वकिलाची सनद द्यावी लागेल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना तज्ज्ञ आणि हुशार समजले जाते, मग त्यांना सह्याद्री उद्ध्वस्त होताना दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. पर्यावरणप्रेमी लोक सह्याद्री उद्ध्वस्त करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा मतपेटीतून दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही राजकारण करत नाही, सरकारनेही राजकारण करू नये, असे जरांगे पाटील म्हणाले. झाडे लावायची आणि जुनी तोडायची, म्हणजे पर्यावरण नष्ट करण्याचा ठेका सरकारने घेतला आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. हा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि सह्याद्री तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. स्वच्छ नैसर्गिक हवेसाठी 33 कोटी झाडे लावायची आहेत, मात्र झाडे तोडल्याने प्रदूषण होत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

मुख्यमंत्र्यांच्या 33 कोटी झाडे लावण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना जरांगे पाटील म्हणाले की, 100-200 वर्षांची झाडे तोडायची आणि वर "वृक्षवल्ली आम्ही सोयरी वनचरे" म्हणायचे, मग यांचे सगेसोयरे नक्की कोण आहेत? टाटा, अदानी हे सगेसोयरे आहेत, हे त्यांनी आधी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. झाडे लावा, झाडे जगवा हा सरकारचा जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे, असे सांगून सरकारने हे थांबवले पाहिजे आणि जनतेच्या मताप्रमाणे चालले पाहिजे, असेही ते म्हणाले.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ