साय डोंगरातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंना जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा
आंदोलनात बोलावले तर कर्जतला जाऊन सहभागी होऊ, असे मुनी निलेशचंद्र यांनी म्हटले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा आता आणखी चर्चेत आला आहे. या कामाला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. त्यातच काही राजकीय नेत्यांनीही या विषयावरून सरकारला घेरले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले असून आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे. यावर आता जैन मुनी निलेशचंद्र यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पर्यावरणाबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी बोलावले तर आपण स्वतः आंदोलनात सहभागी व्हायला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी निमंत्रण दिले तर कर्जतला जाऊन आंदोलनात उतरू, असे निलेशचंद्र मुनी यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते राज ठाकरे यांच्या आंदोलनात सहभागी होणार का, याची चर्चा सुरू आहे.
साय डोंगरातील वृक्षतोडीवरून सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेशचंद्र मुनी यांनी भगवान महावीर यांच्या "जिओ और जीने दो" या विचाराचा उल्लेख केला. झाडे आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी राज ठाकरे आवाज उठवत असतील, तर त्यांच्या या भूमिकेला आपला पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.
कबुतरांचा मुद्दा वेगळा आणि जंगल वाचवण्याचा प्रश्न वेगळा आहे, असे सांगत त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची आपली भूमिका मांडली. आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, असे सांगून झाडे आणि जीव वाचवणाऱ्यांच्या पाठीशी समाज उभा राहील, असेही ते म्हणाले. कंपनी कोणतीही असो, पर्यावरणाच्या मुद्द्यावर आपण तिचे समर्थन करणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी साय डोंगराला भेट दिली आहे. राज ठाकरे हेही या भागाला भेट देणार असल्याने या प्रकरणाकडे राजकीय तसेच पर्यावरणाच्या अशा दोन्ही बाजूंनी लक्ष वेधले जात आहे.
टोरंट प्रकल्पावरून स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी एकत्र आले आहेत. या प्रकल्पासंदर्भातील निर्णयांवर आणि साय डोंगरातील वृक्षतोडीवर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. प्रकल्पाच्या जनसुनावणीत स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. तरीही पुढची प्रक्रिया कशी राबवली जात आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
सध्या स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि काही राजकीय नेते या मुद्द्यावर विरोध नोंदवत आहेत. वृक्षतोडीबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाला पुढे कोणाकोणाचा पाठिंबा मिळतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.