टीव्हीएस iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच, सुरुवातीची किंमत P99,800, रेंज 115km
टीव्हीएस मोटर कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर iQube फिलिपिन्सच्या बाजारात आणली असून तिची सुरुवातीची किंमत P99,800 आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस iQube फिलिपिन्सच्या मार्केटमध्ये लाँच केली आहे. Wheeltek च्या 50व्या वर्धापनदिनाच्या प्रदर्शनात या स्कूटरचे अनावरण करण्यात आले. फिलिपिन्समध्ये तिची सुरुवातीची किंमत P99,800 ठेवण्यात आली आहे.
पारंपरिक पेट्रोल स्कूटरच्या किंमतीच्या आसपास इलेक्ट्रिक स्कूटर लोकांना मिळावी, असा कंपनीचा प्रयत्न आहे, हे विशेष. म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांना पेट्रोल स्कूटरच्या दराच्या जवळपासच पर्याय देण्याचा कंपनीचा हेतू आहे.
टीव्हीएस iQube मध्ये 4.6kW ची हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 125cc स्कूटरच्या कामगिरीशी तुलना करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 82km/h आहे, तर 0 ते 40km/h वेग गाठायला फक्त 4.2 सेकंद लागतात.
या स्कूटरमध्ये 3.5kWh क्षमतेचे 2 बॅटरी पॅक बसवता येतात. दोन्ही बॅटरी वापरल्या, तर प्रत्यक्ष वापरात सुमारे 115km रेंज मिळते. चार्जिंगसाठी 950W चा पोर्टेबल चार्जर दिला आहे. बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 3 तासांपेक्षा कमी वेळ लागतो.
स्कूटरला 7-इंच TFT डिस्प्ले आहे. SmartXonnect आणि क्लाउड-कनेक्टेड फीचर्सच्या मदतीने Turn-by-Turn Navigation, कॉल आणि SMS अलर्ट, म्युझिक, Geofencing तसेच राइड आणि चार्जिंग स्टॅटिस्टिक्स पाहता येतात. सीटखाली 32 लिटरची स्टोरेज स्पेस आहे. पार्किंग सोपे व्हावे म्हणून रिव्हर्स मोडही मिळतो.
टीव्हीएसने बॅटरी आणि मोटरसाठी 5 वर्षे किंवा 60,000km ची वॉरंटी दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, iQube ने जगभरात 10 लाख कस्टमर्सचा टप्पा पार केला आहे.
फिलिपिन्समध्ये iQube सोबत टीव्हीएस Orbiter चेही प्रीव्ह्यू दाखवण्यात आले. त्याची किंमत नंतर जाहीर केली जाणार आहे. याशिवाय टीव्हीएस King EV ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरही त्या प्रदर्शनात सादर करण्यात आली.