शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

ठाण्यात १५ कंत्राटी सफाई कामगारांच्या खात्यात थकीत वेतनाचे ७.५६ लाख जमा

ठाण्यात १५ कंत्राटी सफाई कामगारांच्या खात्यात थकीत वेतनाचे ७.५६ लाख जमा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत जेटिंग गाड्यांवर काम करणाऱ्या १५ कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतनातील फरक आणि नुकसानभरपाई मिळाली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सीवर लाईन, मलटाक्या, चेंबर्स आदींची सफाई करणाऱ्या जेटिंग गाड्यांवर काम करणाऱ्या १५ कंत्राटी सफाई कामगारांना अखेर त्यांचे हक्काचे पैसे मिळाले आहेत. थकीत वेतनाची फरकाची रक्कम आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यात श्रमिक जनता संघ युनियनला यश आले आहे. युनियनने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने या कामगारांच्या बँक खात्यात एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपये जमा केले. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कामगारांच्या वेतनातून ठेकेदार मे. ए. एम. रामचंदानी यांच्याकडून कथितरीत्या बेकायदेशीर कपात केली जात होती. शिवाय वार्षिक भरपगारी रजा आणि रजेचे वेतनही त्यांना दिले जात नसल्याचे समोर आले होते. या प्रकरणात श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी कामगारांचे थकीत किमान वेतनातील फरक आणि भरपगारी रजेचे वेतन यांची गणना केली. त्यानंतर कामगारांच्या वतीने ठाणे कामगार उपआयुक्त कार्यालयात किमान वेतन अधिनियम, १९४८ च्या कलम २० (२) अंतर्गत वसुली दावा क्रमांक ०२/२०२५ दाखल केला.

या दाव्यावर किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत प्राधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी ४ मे २०२६ रोजी आदेश दिला. आदेशानुसार ठेकेदार मे. ए. एम. रामवंदानी यांनी १५ अर्जदार कामगारांना किमान वेतनातील फरकापोटी ३ लाख ७८ हजार ३५६ रुपये द्यायचे होते. तितकीच म्हणजे आणखी ३ लाख ७८ हजार ३५६ रुपये रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यायची होती. अशी एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपयांची रक्कम आदेशाच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत अदा करण्याचे निर्देश होते.

आदेशात आणखी एक अट नमूद होती. ठेकेदाराने ठरलेल्या मुदतीत आदेशाचे पालन केले नाही, तर मूळ मालक म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने पुढील ६० दिवसांच्या आत ही रक्कम कामगारांना द्यावी, असे त्यात म्हटले होते.

श्रमिक जनता संघ युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम २१ (४) अन्वये आपल्या जबाबदारीचे पालन केले. प्रशासनाने २७ ऑक्टोबर रोजी संबंधित १५ सफाई कामगारांच्या बँक खात्यात एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपये जमा केले. प्रत्येक कामगाराला थकबाकीपोटी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. कामगारांची थकीत रक्कम दिल्याबद्दल श्रमिक जनता संघाच्या वतीने चिटणीस सुनील दिवेकर यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ