डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयावर परिणाम, हार्ट अटॅकआधी दिसतात ही लक्षणे
गणपती विसर्जन मिरवणुकीत आणि सण-समारंभांत डीजेचा मोठा आवाज हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
सण-समारंभ असो, गणपती उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम, डीजे लावला जातोच. विसर्जन मिरवणुकांमध्ये तर डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊड स्पीकरशिवाय पानच हलत नाही, असं वाटतं. पण या मोठ्या आवाजातील डीजेमुळे हृदयाचं मोठं नुकसान होऊ शकतं, हे लक्षात घ्यायला हवं.
अतिशय तीव्र आणि कर्कश आवाजामुळे शरीरातला स्ट्रेस रिस्पॉन्स वाढतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब थोड्या वेळासाठी वाढतात. यामुळे कधीही हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार असलेल्या महिला किंवा पुरुषांनी मोठ्या आवाजातल्या डीजेसमोर जाणं टाळावं. छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणं किंवा अचानक बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसली, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
मोठ्या आवाजातल्या डीजेचा परिणाम फक्त हृदयावरच नाही, तर मज्जासंस्था आणि रक्तदाब यांसारख्या इतर गोष्टींवरही होतो. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या की रक्तप्रवाहात अडथळे येतात. कधी कधी अचानक हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदय रक्त पंप करणं थांबवतं, अशा वेळी स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे मोठ्या आवाजातल्या डीजेसमोर जाणं टाळलेलंच बरं, नाहीतर शरीराशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
दीर्घ काळ मोठ्या आवाजाच्या डीजेजवळ राहिल्यामुळे शरीरातला तीव्र स्ट्रेस रिस्पॉन्स वाढतो. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढल्यामुळे शरीराची स्थिती बिघडते. उच्च रक्तदाब आणि इस्केमिक हार्ट डिसीजचा धोकाही वाढू शकतो. डीजे सिस्टीममधून येणारा जड बेस आवाज शरीराला आतून हादरवून टाकतो. या आवाजामुळे फक्त हृदयाचा त्रास असलेल्या माणसांचंच नाही, तर निरोगी माणसांचंही हृदय बंद पडू शकतं. त्यामुळे नुसतंच मोठ्या आवाजाला दोष न देता, हृदयविकार किंवा ठोक्यांमधलं बिघडलेलं प्रमाण वेळीच तपासून घेणंही तितकंच गरजेचं आहे.
हृदयाशी संबंधित त्रास वाढू लागला, की छातीत दाब जाणवणं, घट्टपणा किंवा अस्वस्थता वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अचानक विनाकारण खूप घाम येणं, मळमळ होणं, चक्कर येणं, विनाकारण अशक्तपणा वाटणं किंवा छातीतली वेदना डाव्या हातात, पाठीत, मानेत किंवा नाडीपर्यंत पसरणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही मुलं तर अचानक बेशुद्धही पडतात. त्वचा किंवा ओठ निळसर पडणं आणि छातीत धडधड होणं अशी लक्षणं दिसली, तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे.
मोठ्या आवाजाचा त्रास फक्त हृदयाचा आजार असलेल्या लोकांनाच नाही, तर लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध यांच्यातही दिसून येतो. जन्मजात हृदयविकार किंवा ठोक्यांचा आजार असलेल्या मुलांना मोठ्या आवाजातल्या डीजेसमोर नेणं टाळावं, कारण त्यामुळे त्यांच्या शरीराला हानी पोहोचू शकते. डीजेच्या आवाजामुळे कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो.