टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! संपूर्ण EV लाइनअपवर Battery-as-a-Service योजना, 4.69 लाखांपासून मिळणार कार
टाटा मोटर्सने टियागो EV पासून हॅरियर EV पर्यंत संपूर्ण इलेक्ट्रिक लाइनअपवर BaaS योजना आणली असून, यामुळे कारची सुरुवातीची किंमत कमी होते पण बॅटरी वापरासाठी प्रति किलोमीटर वेगळं शुल्क द्यावं लागतं.
इलेक्ट्रिक कार घेताना सगळ्यात जास्त खर्च बॅटरीचाच असतो, हे आता सगळ्यांना माहीत झालंय. गाडीची सुरुवातीची किंमत जास्त दिसण्यामागे हेच सगळ्यात मोठं कारण असतं. हाच खर्च कमी दाखवण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण EV लाइनअपवर Battery-as-a-Service म्हणजे BaaS ही स्कीम आणली आहे. या स्कीममुळे कार आणि बॅटरीचा खर्च वेगळा वेगळा भरता येणार आहे, म्हणजे कारसाठी एक पेमेंट आणि बॅटरी वापरण्यासाठी दुसरं वेगळं पेमेंट अशी सोय ग्राहकांना मिळणार आहे.
टियागो EV, पंच EV, नेक्सॉन EV, कर्व्ह EV, सिएरा EV आणि फ्लॅगशिप हॅरियर EV अशा सगळ्या मॉडेल्सवर हा BaaS पर्याय उपलब्ध आहे. एखाद्याने BaaS निवडलं की गाडीची एक्स-शोरूम किंमत आपोआप खाली येते. उदाहरण द्यायचं झालं तर टियागो EV ची BaaS किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते. पंच EV साठी हीच किंमत 6.59 लाखांपासून आहे, तर नेक्सॉन EV 8.99 लाखांपासून मिळणार आहे.
वरच्या सेगमेंटमध्ये गेलं की कर्व्ह EV ची BaaS किंमत 10.99 लाखांपासून सुरू होते. सिएरा EV साठी ही किंमत 11.99 लाख आहे आणि हॅरियरच्या EV व्हर्जनसाठी 14.49 लाख रुपयांपासून किंमत ठेवली आहे. आता या सगळ्यात गंमत अशी की, कार स्वस्त वाटली तरी बॅटरी वापरण्यासाठी वेगळं शुल्क द्यावं लागतं. हे शुल्क प्रति किलोमीटर आकारलं जातं आणि मॉडेलनुसार 2.6 रुपयांपासून 5.9 रुपये प्रति किलोमीटरपर्यंत जातं. महत्त्वाचं म्हणजे या शुल्कात चार्जिंगचा, मेंटेनन्सचा किंवा दुरुस्तीचा खर्च धरलेला नाही, तो वेगळाच येतो. म्हणजेच बॅटरीच्या शुल्काशिवाय गाडी चार्ज करण्याचा आणि तिची देखभाल करण्याचा खर्चही ग्राहकाला स्वतंत्रपणे सोसावा लागतो.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ग्राहकाला कारसाठी एक आर्थिक करार करावा लागतो आणि बॅटरी वापरण्यासाठी त्याच्यापेक्षा वेगळं बिल भरावं लागतं. डाउन पेमेंट किती भरलंय, बॅटरीची क्षमता काय आहे आणि कर्जाचा कालावधी किती ठेवलाय, यावरून प्रत्यक्ष मासिक खर्च कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे गाडी बुक करण्याआधी आपण रोज किती किलोमीटर चालवणार आहोत, याचा अंदाज घेणं गरजेचं ठरतं, कारण याच अंदाजावरून BaaS पर्याय फायद्याचा ठरतो की नाही, हे ठरणार आहे.
ज्यांचा रोजचा प्रवास कमी अंतराचा आहे, त्यांच्यासाठी सुरुवातीचा खर्च कमी करणारा हा BaaS पर्याय फायद्याचा ठरू शकतो. पण जे लोक रोज जास्त किलोमीटर गाडी चालवतात, त्यांनी प्रति किलोमीटर लागणारं शुल्क आणि त्यावरून येणारा एकूण दीर्घकालीन खर्च आधी नीट मोजून घ्यायला हवा. ज्यांना असं वेगळं गणित नको आहे, त्यांच्यासाठी कार आणि बॅटरी दोन्ही एकत्रच पारंपरिक पद्धतीने खरेदी करण्याचा जुना ऑप्शनही कायम उपलब्ध आहे, त्यामुळे ग्राहकांना दोन्ही पर्यायांमधून आपल्या गरजेनुसार निवड करता येते.