टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस भारतात बनवणार ५० हून अधिक देशांतील मार्केटसाठी वाहने
रांजणगाव प्रकल्पात उत्पादन होणार; टाटाचे आर्किटेक्चर आणि स्टेलँटिसचे इंजिनिअरिंग नेटवर्क एकत्र येणार.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांनी भारतात नवीन वाहने विकसित करण्यासाठी निश्चित करार केला आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. या करारानुसार 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी नवीन वाहने तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) म्हणजेच टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायही या सहकार्यात सहभागी आहे.
या प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या वाहनांचे प्रोडक्शन पुण्याजवळील रांजणगाव येथील संयुक्त प्रकल्पात केले जाणार आहे. टाटा आणि जीपच्या वाहनांसह नवीन जागतिक मॉडेल्सचे प्रोडक्शन तिथे करण्याची योजना आहे.
रांजणगावमधील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड (FIAPL) हा टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांचा 50:50 संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पात सध्या टाटा नेक्सॉन, अल्ट्रॉझ आणि कर्व्ह यांसारख्या गाड्या तसेच जीपची काही मॉडेल्स तयार होतात. जीप कंपास आणि मेरिडियनचे प्रोडक्शन इथे होते, तर ग्रँड चेरोकी आणि रँग्लरची असेंब्ली CKD पद्धतीने केली जाते. कारखान्यात इंजिन, ट्रान्समिशन आणि इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनशी संबंधित प्रोडक्शन सुविधाही आहेत.
करारानुसार टाटा मोटर्स आपल्या वाहनांचे आर्किटेक्चर आणि प्रोडक्ट टेक्नोलॉजी वापरण्याची संधी स्टेलँटिसला देणार आहे. स्टेलँटिस भारतातील आपल्या इंजिनिअरिंग टीमच्या मदतीने नवीन वाहनांचा विकास करेल. त्यानंतर वेगवेगळ्या देशांतील नियम, रस्त्यांची परिस्थिती आणि स्थानिक ग्राहकांच्या गरजांनुसार वाहनांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. त्यामुळे भारतातील वाहन विकासाचे कौशल्य ग्लोबल मार्केटसाठीही वापरता येऊ शकते.
रांजणगाव प्लांटमधून जपान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये वाहनांची निर्यात याआधीच केली जाते. नवीन करारामुळे स्टेलँटिसच्या ग्लोबल मार्केटसाठी विकसित केलेल्या वाहनांचे प्रोडक्शन आणि निर्यात वाढवण्याची संधी निर्माण होऊ शकते. भारतातील ऑटो पार्ट्स पुरवठादार आणि सध्याच्या प्रोडक्शन मशिनरीलाही या उपक्रमाचा फायदा होण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्स आणि स्टेलँटिस यांच्यातील इंडस्ट्रीयल पार्टनरशिप 2 दशकांहून जुनी आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये दोन्ही कंपन्यांनी सहकार्याबाबत सामंजस्य करार केला होता. आता निश्चित करारामुळे वेईकल आर्किटेक्चर आणि टेक्नोलॉजीच्या सहकार्याला ठोस स्वरूप मिळाले आहे.
स्टेलँटिस समूहात जीप, सिट्रॉएन, फियाट, प्यूजो, ओपेल, मासेराती आणि अल्फा रोमियो यांसारखे ब्रँड्स आहेत. या भागीदारीमुळे भारतातील इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन सुविधांचा वापर करून आंतरराष्ट्रीय गरजांनुसार वाहने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन मॉडेल्सची नावे, लाँचची वेळ आणि एक्स्पोर्टचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.