1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! तामिळनाडू सरकारची मोठी घोषणा, 'या' दिवशी अधिकृतपणे लाँच होणार थाईमामन योजना
तामिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी सोन्याची अंगठी देणारी योजना जाहीर केली असून येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री विजय या योजनेचा अधिकृत शुभारंभ करणार आहेत.
तामिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी एक वेगळी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बाळांना एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. या योजनेचं नाव आहे थाईमामन थंगा मोतिरम थिट्टम. येत्या 28 तारखेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय या योजनेचा अधिकृत शुभारंभ करणार आहेत.
ही योजना खरं तर माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीदिनी, म्हणजे 15 सप्टेंबरला सुरू होणार होती. या दिवशी तामिळनाडूत ही सोन्याच्या अंगठीची योजना सुरू करण्याचा सरकारचा मूळ बेत होता. पण मुख्यमंत्री विजय यांच्या यूके दौऱ्यामुळे ती पुढे ढकलावी लागली आणि त्यामुळे योजनेच्या शुभारंभाची तारीख बदलण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकार या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1.28 लाख सोन्याच्या अंगठ्यांचं वाटप करणार आहे.
22 जूनपासून सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला या योजनेखाली एक ग्रॅम सोन्याची अंगठी मिळणार आहे. यासाठी 23 जून रोजी सरकारने एक सरकारी आदेश काढला होता. एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूत दरवर्षी 7.8 लाख बाळांचा जन्म होतो. यापैकी 4.2 लाख म्हणजे 53 टक्के प्रसूती सरकारी रुग्णालयांमध्ये होतात, म्हणजेच राज्यातील निम्म्याहून अधिक बाळंतपणं सरकारी रुग्णालयांतच होतात. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 1,28,000 सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यात आल्या आहेत.
या योजनेचा फायदा कोणाला मिळणार, याबाबतही सरकारने स्पष्ट अटी घातल्या आहेत. तामिळनाडूच्या कायम रहिवासी असलेल्या आणि प्रेग्नन्सी अँड चाइल्ड ट्रॅकिंग म्हणजे PICME या प्रणालीत नोंदणी करून RCH ID मिळवलेल्या मातांनाच या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच PICME प्रणालीत नोंदणी नसलेल्या किंवा तामिळनाडूच्या कायम रहिवासी नसलेल्या मातांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 28 सप्टेंबरपासून सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बाळांना डिस्चार्जच्या वेळीच ही सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.
या अंगठीबाबत काही खास खबरदारीही घेण्यात आली आहे. प्रत्येक अंगठीवर एक वेगळा अनुक्रमांक असेल आणि तिचं पॅकेजिंग अशा पद्धतीने केलं जाईल की त्यात कुणालाही सहज बदल किंवा फेरफार करता येणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक अंगठीची स्वतंत्र ओळख राहील आणि तिच्यात कोणतीही छेडछाड होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. 22 जून 2026 पासून जन्मलेल्या मुलांसाठी राज्यभरातील 107 हब केंद्रांवर दररोज 100 सोन्याच्या अंगठ्यांचं वाटप केलं जाईल.
महत्त्वाचं म्हणजे, या योजनेचा फायदा फक्त तामिळनाडूच्या कायमच्या रहिवाशांनाच मिळणार आहे. इतर राज्यांतील सरकार किंवा नागरिकांचा या योजनेशी काहीही संबंध नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.