ताडाळीत वर्कशॉपच्या शेडवर चढताच विजेचा शॉक, २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; कुटुंबाला १४ लाखांची मदत
चंद्रपूर येथील ताडाळीतल्या केतन हुंडाई वर्कशॉपमध्ये विजेचा तीव्र शॉक लागून मोहन कोयचाडे या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी शुभम उमाटे जखमी झाला.
चंद्रपूर येथील ताडाळीतल्या केतन हुंडाई वर्कशॉपमध्ये काम करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याचा सहकारीही जखमी झाला आहे. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव सारंग उर्फ मोहन कोयचाडे (वय २१, रा. मोरवा) असे आहे. जखमी झालेले शुभम उमाटे (वय २९) यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन कोयचाडे आणि शुभम उमाटे हे दोघे तरुण या वर्कशॉपमध्ये डेंटिंग आणि पेंटिंगचे काम करतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे दोघे कामावर पोहोचले. काहीतरी जळाल्याचा किंवा वेगळा वास येत असल्याने त्यांनी टिनाच्या शेडवर चढून पाहणी केली.
वर्कशॉपजवळ असलेल्या एका झाडात जिवंत विद्युत तारेतून विजेचा प्रवाह उतरला होता. मोहन कोयचाडे यांचा चुकून त्या झाडाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.
सोबत असलेल्या शुभम उमाटे यांनी मोहनला त्या विजेच्या झटक्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. कसेतरी त्यांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असतानाच वाटेत मोहन कोयचाडे यांचा मृत्यू झाला.
मोहन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाचा आधारच हिरावला गेल्याने कोयचाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मोहनच्या मृत्यूनंतर नागरिकांनी केतन हुंडाई कंपनीकडे आर्थिक मदतीची मागणी केली. गावातील नागरिक, नातेवाईक आणि कामगारांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. तणाव वाढत असल्याचे दिसताच रामनगर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक तिथे दाखल झाले. या तणावाच्या स्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
आर्थिक मदत मिळाली नाही तर मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला होता. तब्बल अडीच तासांनंतर मोहनच्या कुटुंबाला १४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि त्याच्या वडिलांना नोकरी देण्याचे ठरले. हे ठरल्यानंतरच नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेतला.