तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीचा कोकोनट हलवा घरी कसा कराल
तोंडात विरघळणारा तामिळनाडूतील पारंपरिक कोकोनट हलवा ओल्या खोबऱ्याचा किस, तूप आणि गूळ वापरून १० ते १५ मिनिटांत करता येतो.
सणासुदीच्या आणि उत्सवाच्या दिवसांत घरोघरी वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ बनतात. लाडू, खीर, शिरा, गुलाबजाम, रस्सगुला असे ठरलेले पदार्थ नेहमी केले जातात. पण दरवेळी तेच ठरावीक पदार्थ करण्याऐवजी यंदा तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीचा कोकोनट हलवा करून बघता येईल. या पदार्थाला 'थेन्गई थेराट्टीपाल' असेही म्हणतात आणि तो सोप्या पद्धतीने बनवता येतो.
हा हलवा ओल्या खोबऱ्याचा किस, तूप आणि गूळ वापरून बनवता येतो. तो करायला फक्त १० ते १५ मिनिटं लागतात. तोंडात विरघळणारा हा शाही पदार्थ खाल्ल्यानंतर घरातले सगळेच तुमचं कौतुक करतील.
सणाच्या दिवसांत बाहेरून विकतचे गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने हा हलवा करता येतो. भेसळयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेला पदार्थ चवीला तर चांगला लागतोच, शिवाय शरीरासाठीही गुणकारी ठरतो. सणासुदीच्या दिवसांत घरात विविध गोड पदार्थ मोठ्या आवडीने बनवले जातात, त्यामुळे यात हा हलवाही करून पाहता येईल.
साहित्य: ओल्या खोबऱ्याचा किस, चिरलेला गूळ, हिरवी वेलची, तांदळाचे पीठ, पाणी, साजूक तूप, ओल्या खोबऱ्याचे पातळ काप आणि काजूचे तुकडे.
कृती अशी: सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, गूळ, वेलची, तांदळाचे पीठ आणि अर्धा कप पाणी घालावं. हे सगळं साहित्य नीट बारीक वाटून घ्यावं. तांदळाच्या पिठामुळे हलव्याला घट्टपणा येतो आणि पदार्थाची चवही छान लागते.
त्यानंतर कढईत तूप गरम करायला ठेवावं. तूप तापलं की त्यात खोबऱ्याचे पातळ काप आणि काजूचे तुकडे घालावेत. ते हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत आणि बाजूला काढावेत.
कढईत उरलेल्या तुपात वाटून घेतलेलं खोबरं आणि गुळाचं मिश्रण घालावं. चमच्याने सतत ढवळत राहावं, म्हणजे पदार्थ कढईला चिकटत नाही. मंद आचेवर गुळाचा पाक आणि खोबरं शिजवत सगळं साहित्य नीट एकजीव करावं.
मिश्रणाला गडद रंग आला की त्यात तळलेले काजू, खोबऱ्याचे काप आणि एक चमचा तूप घालून पुन्हा नीट मिसळावं. एवढं केलं की तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीचा कोकोनट हलवा तयार होतो. सणावारांच्या दिवसांत काही गोड खावंसं वाटलं, तर हा हलवा घरी करता येईल.