स्वॅगर बॉय आणि मेक्सिकोचा फ्रीबोट एकत्र; मराठी, हिंदी, स्पॅनिशमधलं 'नाच ना' आलं
'माझ्या सोन्या' मुळे ओळख मिळालेला रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकोचा इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकार फ्रीबोट यांचं 'नाच ना' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
संगीताला भाषा, प्रांत किंवा देशाच्या सीमा नसतात, हे दाखवणारं एक नवं गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. 'माझ्या सोन्या' या गाण्यामुळे लोकप्रिय झालेला मराठमोळा रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकोचा इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकार फ्रीबोट (FREEBOT) यांचं 'नाच ना' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी, हिंदी आणि स्पॅनिश अशा तीन भाषा या गाण्यात एकत्र येतात. महाराष्ट्रातली टेक ट्रायबल संगीतशैली आणि मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीत यांचा अनोखा मेळ यात ऐकायला मिळतो. या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे सोशल मीडियावरही गाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
'वर्ल्ड ऑफ वाईब्स' या रेकॉर्ड लेबलच्या माध्यमातून हे गाणं सादर करण्यात आलं आहे. कोल्हापूरचे निर्माता-दिग्दर्शक रॉक कच्ची यांनी गाण्याची निर्मिती केली आहे. झाहिद सय्यद यांनी दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एकता, अभिनेता रॉक कच्ची आणि रॅपर स्वॅगर बॉय दिसतात.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली संगीतशैली आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला गेला आहे. स्वॅगर बॉयची रॅप शैली, फ्रीबोटच्या इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आणि तीन भाषांचा वापर यामुळे हे गाणं वेगळं ठरत आहे.
या गाण्याची संकल्पना फ्रीबोट यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आकाराला आली. 'वर्ल्ड ऑफ वाईब्स'च्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या टेक ट्रायबल संगीतशैलीवर आधारित काहीतरी वेगळं करावं, असा विचार पुढे आला. या संगीतावर स्वॅगर बॉयची शैली खुलून येईल, असा विश्वास रॉक कच्ची यांना वाटला. त्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांत स्वॅगर बॉयने हे गाणं तयार केलं.
काही मोठ्या म्युझिक लेबल्सनी या गाण्यात रस दाखवला होता. मात्र गाण्याची बीट बदलून ते हिंदीत सादर करावं, अशा सूचना आल्या. त्यामुळे 'वर्ल्ड ऑफ वाईब्स'ने गाण्याची मराठी ओळख कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रायोजकांकडून नकार मिळाल्यानंतर रॉक कच्ची आणि त्यांच्या टीमने स्वतः पैसे गुंतवून गाण्याची निर्मिती आणि म्युझिक व्हिडीओ पूर्ण केला.
या प्रकल्पात रॉक कच्ची यांनी सेकंडरी प्रोड्युसर, लेखक आणि सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी स्वॅगर बॉय आणि वाय डी यांच्या 'माझ्या सोन्या' या गाण्याच्या व्हिडीओसाठीही झाहिद सय्यद यांनी काम केलं होतं.
रॉक कच्ची म्हणाले, "'तांबडी चांबडी' या गाण्यानंतर मी रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकन आर्टिस्ट फ्रीबोट यांना घेऊन 'नाच ना' हे गाणं केलं आहे. हे केवळ एक गाणं नसून महाराष्ट्राच्या प्रादेशिक संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वॅगर बॉयचं संगीत, गीतलेखन आणि गायन यांसोबत फ्रीबोटच्या मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव या गाण्यात अनुभवायला मिळेल."
महाराष्ट्राच्या सांगीतिक संस्कृतीला आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक संगीतविश्वाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि स्थानिक संगीताचा अभिमान जपत जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश या गाण्यातून दिला आहे. हे गाणं डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
स्वॅगर बॉय म्हणाला, "'माझ्या सोन्या' या गाण्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केलात. आता मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन आणि मेक्सिकन स्टाइलमधलं मराठी गाणं घेऊन आलो आहे. रॉक दादाचे आभार की त्यांनी या गाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मेक्सिकन आर्टिस्ट भारतात आला असताना रॉक दादाने त्याच्यासोबत गाणं करण्याचा विचार मांडला आणि फ्रीबोटही यासाठी तयार झाला."
'नाच ना' या गाण्याचं शूटिंग पुण्यात करण्यात आलं आहे, असंही स्वॅगर बॉयने सांगितलं. "माझ्यासाठी हे गाणं स्वप्नवत आहे. सोशल मीडियावरही सध्या गाणं ट्रेंडिंगला आहे. माझ्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांचं असंच प्रेम मिळू दे. तुम्ही छान-छान रील व्हिडीओ बनवा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका," असं आवाहन त्याने चाहत्यांना केलं आहे.
महाराष्ट्रातील संगीतशैलीला मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताची जोड देणारं 'नाच ना' हे गाणं प्रादेशिक संगीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा एक वेगळा प्रयत्न ठरत आहे.