सिएटलमधील दिवाळी कार्यक्रमात जेक लँग आणि साथीदारांचा गोंधळ, हिंदूंविरोधी फलक झळकवले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वॉशिंग्टन राज्यातील सिएटलमध्ये दिवाळी कार्यक्रमात कट्टर उजव्या कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ घातला. प्रत्यक्षदर्शींनुसार नेतृत्व जेक लँगकडे होते. उपस्थित नागरिकांनी त्यांना रोखले.
अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात असलेल्या सिएटल शहरात दिवाळी उत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना अमेरिकन कट्टर उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी अचानक घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जगभर दिवाळी आनंदाने साजरी होत असताना या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय आणि हिंदू समुदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यकर्त्यांनी हिंदू समुदायाला लक्ष्य करत जातीय आणि वंशद्वेषी शेरेबाजी केली. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच एकत्र येत त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. कोणताही मोठा अनुचित प्रकार घडण्याआधीच परिस्थिती हाताळली गेली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळाचे नेतृत्व जेक लँग (Jake Lang) या उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याने केले. लँग आणि त्याच्या साथीदारांच्या हातात "सर्व ठिपक्यांच्या डोक्यांना हद्दपार करा" (Deport All Dot Heads) असे लिहिलेले वादग्रस्त फलक होते. हिंदू महिलांच्या कपाळावरील टिकली किंवा कुंकू यांना लक्ष्य करून ही अपमानास्पद घोषणा वापरली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर लँगने सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो शेअर केले. आपल्या पोस्टमध्ये त्याने दावा केला की सिएटल दिवाळी महोत्सवात डझनभर अँटिफा आणि हिंदूंनी आपल्यावर हल्ला केला, आणि "Deport All Dot Heads" हा फलक त्यांना आवडला नसावा. टेक्ससारख्या पारंपरिक रिपब्लिकन राज्यात डेमोक्रॅट्स पक्षाचा विजय होण्यास हिंदू समुदाय जबाबदार आहे, असेही त्याने म्हटले. या पोस्टमध्ये त्याने अत्यंत अपमानास्पद आणि चिथावणीखोर भाषा वापरली.
अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा या प्रकरणामागे मोठा प्रभाव दिसत आहे. लँगने नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांवर अविश्वास व्यक्त केला आहे. टेक्सास आणि कॅन्सससारख्या राज्यांत "रेड वॉल" म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला कोसळल्याचा आरोप करत त्याने हा निकाल हेराफेरीचा असल्याचे म्हटले आहे.
जेक लँग हा ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या प्रसिद्ध हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक राहिला आहे. या प्रकरणी त्याला चार वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याला माफी दिली होती. आता त्याने सोशल मीडियावरून वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटलवर निषेध मोर्चा काढण्याचे आवाहन पुन्हा केले आहे.
सिएटलमधील ही घटना अचानक घडलेली नसून, गेल्या काही दिवसांत अमेरिकेत हिंदू धार्मिक स्थळे आणि समुदायाला लक्ष्य करण्याचे प्रयत्न वाढल्याचे दिसते. नुकतेच शिकागोजवळील एका हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याची योजना आखणाऱ्या अलेक्झांड्रोस पापोराकिस या १९ वर्षीय संशयिताला सुरक्षा यंत्रणांनी वेळेत अटक केली होती.
या साखळी घटनांमुळे अमेरिकेतील अनिवासी भारतीय आणि हिंदू समाजात सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अशा वंशद्वेषी कृत्यांचा निषेध केला असून, सांस्कृतिक सण शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली जात आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.