गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनने घेतला दत्तक, वरळी किल्ल्याच्या संवर्धनाचाही प्रयत्न

शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनने घेतला दत्तक, वरळी किल्ल्याच्या संवर्धनाचाही प्रयत्न छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ल्याचे संगोपन आरपीजी फाउंडेशन करणार आहे. वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबईचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जपून तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वारसा संवर्धनाच्या उपक्रमांना चालना मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने हे उपक्रम पुढे जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार आरपीजी फाउंडेशनने शिवडी किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे.

याच योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्थानिक संस्कृतीचे दस्तऐवजीकरण, नागरी सुविधांमध्ये सुधारणा आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगारनिर्मिती अशा अनेक बाजूंनी मुंबईचा वारसा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील शिवडी किल्ला हा शहराच्या सागरी इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप जपून त्याला नव्याने ओळख मिळवून देण्यासाठी आरपीजी फाउंडेशनने तो दत्तक घेतला आहे. किल्ल्याचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि मुंबईच्या सागरी वारशाशी असलेले त्याचे नाते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांना मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे.

आरपीजी फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या 'द हेरिटेज प्रोजेक्ट'च्या माध्यमातून बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ला या ठिकाणांच्या संवर्धनासाठी संशोधन, जनसहभाग, सांस्कृतिक उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत 50 हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचता आले असून, 270 हून अधिक महिलांना उपजीविका आणि उद्योजकतेसाठी मदत करण्यात आली आहे.

वरळी किल्ल्याच्या बाबतीत वरळी कोळीवाड्यातील वारसा संवर्धनाचे काम किल्ल्यापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. कोळी समाजाचा इतिहास, परंपरा, जीवनशैली आणि सांस्कृतिक ओळख जपून हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर आहे. वरळी कोळीवाड्यात 71 हून अधिक पथदिवे, 30 हून अधिक माहितीफलक आणि सातहून अधिक सार्वजनिक भित्तिचित्रे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारल्या असून कोळी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला सार्वजनिक व्यासपीठही मिळाले आहे.

वरळी कोळीवाड्यातील 120 हून अधिक महिलांना कौशल्यविकास आणि उद्योजकतेसाठी मदत करण्यात आली आहे. 'शेफ्स ऑफ कोळीवाडा' या उपक्रमातून महिलांनी पारंपरिक कोळी खाद्यसंस्कृतीला नवी ओळख मिळवून दिली आहे. विविध खाद्य महोत्सव आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी होता येत असल्याने त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळत आहे. स्थानिक परंपरा जपण्यासोबतच रोजगारनिर्मितीलाही त्यामुळे हातभार लागत आहे.

मुंबईतील बाणगंगा तलाव परिसरातही वारसा संवर्धनासोबत या स्थळाचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत 150 हून अधिक महिलांना उद्योजकता, शिवणकाम आणि आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध कार्यक्रम आणि अनुभवात्मक उपक्रमांमधून 500 हून अधिक पर्यटकांना या वारसास्थळाशी जोडण्यात आले आहे.

मुंबईचा वारसा केवळ ऐतिहासिक वास्तूंपुरता मर्यादित नाही. स्थानिक समुदायांच्या परंपरा, कला, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीतही तो जिवंत आहे. त्यामुळे वारसा संवर्धनासोबत परिसरातील नागरी सुविधा सुधारणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पर्यटनाला चालना देणे यांना महत्त्व आले आहे. वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून शिवडी आणि वरळी किल्ल्यांसारख्या वास्तूंचे संगोपन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे यशस्वी होताना दिसत आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ