शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान
सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली घसरण सोमवारी आणखी तीव्र झाली. नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मार्केट उघडताच जोरदार आपटले आणि गुंतवणूकदारांचे तब्बल 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी सेन्सेक्स 73,734.83 अंकांवर घसरणीसह उघडला. सकाळी 9:45 वाजता त्यात 888.18 अंकांची घसरण दिसून आली आणि तो 1.20 टक्क्यांनी घसरून 73,182.42 अंकांवर व्यवहार करत होता. त्याच वेळी 50 शेअर्सचा निफ्टी 23,064 अंकांवर घसरणीसह उघडला. सकाळी 9:46 वाजता निफ्टी 1.17 टक्के म्हणजेच 270.55 अंकांनी घसरून 22,869.95 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजार उघडताच सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त दोन शेअर्समध्ये वाढ दिसली, तर उर्वरित 28 शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये टीसीएसच्या शेअरमध्ये 0.33 टक्क्यांची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली, तर बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 1.11 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली.
पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जात आहे. गुंतवणूकदारांचे नुकसान किती मोठे आहे, हे बीएसईच्या अधिकृत आकडेवारीवरूनच स्पष्ट होते.
बीएसईच्या अधिकृत आकडेवारीनुसार, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सगळ्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल अंदाजे 6 लाख कोटी रुपयांनी घसरले असून ते आता अंदाजे 476 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच एवढ्या मोठ्या रकमेचे नुकसान फक्त एका दिवसात गुंतवणूकदारांना सोसावे लागले.
शेअर बाजार गडगडण्यामागे पुढील कारणे सांगितली जात आहेत. पश्चिम आशियामध्ये वाढता संघर्ष, तेलाच्या किमतीत मोठी वाढ, अमेरिकन बाँड यील्डमध्ये मोठी वाढ, भारतीय चलनातील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री, ही ती कारणे आहेत. या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून सोमवारी बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक दिवसभर लाल रंगातच व्यवहार करत राहिले आणि गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.