शारदीय नवरात्र 11 ते 19 ऑक्टोबर: नऊ दिवस, नऊ देवी आणि नऊ रंगांची यादी
घटस्थापना 11 ऑक्टोबर 2026 रोजी असून नवरात्रोत्सव 19 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. प्रत्येक दिवसाचा रंग ठरलेला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्रासह देशभरात उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणारी शारदीय नवरात्र ही आदिशक्तीच्या नऊ रूपांच्या उपासनेचा पर्वकाळ मानली जाते. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा होते. प्रत्येक दिवसासाठी एक रंग ठरलेला असतो आणि त्या रंगाचे कपडे घालून भाविक उत्सवात सहभागी होतात.
यंदा घटस्थापना 11 ऑक्टोबर 2026 रोजी आहे. नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात चालणार आहे. रविवार, 11 ऑक्टोबरला उत्सवाची सुरुवात 'केशरी' रंगाने होईल. केशरी रंग ऊर्जा, चैतन्य आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
सोमवार, 12 ऑक्टोबरला शांतता आणि पावित्र्याचे प्रतीक असलेला 'पांढरा' रंग आहे. मंगळवार, 13 ऑक्टोबरला प्रेमाचा आणि उत्साहाचा रंग असलेला 'लाल' रंग उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. बुधवार, 14 ऑक्टोबरला 'निळा', गुरुवार, 15 ऑक्टोबरला चैतन्यमय 'पिवळा' आणि शुक्रवार, 16 ऑक्टोबरला निसर्गाशी जोडणारा 'हिरवा' रंग ठरला आहे.
उत्तरार्धात शनिवार, 17 ऑक्टोबरला 'ग्रे / राखाडी', रविवार, 18 ऑक्टोबरला 'जांभळा' आणि सोमवार, 19 ऑक्टोबरला 'मोरपिशी' रंगाने उत्सवाची सांगता होईल.
या नऊ दिवसांत शाळा, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, विविध मंडळे आणि महिला वर्गात या रंगांची मोठी क्रेझ दिसणार आहे. कार्यालये, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणीही या रंगांनुसार स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध शोचे आयोजन होणार आहे. यामुळे रंगांची उधळण तर होईलच, पण नागरिकांमधील परस्पर सलोखा आणि आनंदाची देवाणघेवाण वाढेल, यात शंका नाही.
प्रतिपदा (पहिली माळ): या दिवशी माता शैलपुत्री यांची पूजा होते. त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असते. रंग नारंगी (भगवा) असून तो उत्साह, तेज, ऊर्जा आणि शौर्याचे प्रतीक मानला जातो.
द्वितीया (दुसरी माळ): माता ब्रह्मचारिणी यांचे हे रूप कठोर तपश्चर्या करणारे असून त्यांच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असतो. हे रूप ज्ञान, तप आणि संयमाचे प्रतीक आहे. रंग पांढरा असून तो पवित्रता, शांतता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो.
तृतीया (तिसरी माळ): या दिवशी माता चंद्रघंटा यांचे पूजन होते. त्यांच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र असतो, म्हणून त्यांना 'चंद्रघंटा' म्हणतात. हे रूप भक्तांच्या सर्व संकटांचा नाश करणारे मानले जाते. रंग लाल असून तो ऊर्जा, साहस, पराक्रम आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
चतुर्थी (चौथी माळ): माता कूष्मांडा हे चौथे रूप. सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या या देवीने आपल्या मंद हास्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले, म्हणून त्यांना आदिशक्ती मानले जाते. रंग निळा असून तो अथांग आकाश, स्थिरता आणि शांततेचे प्रतीक आहे.
पंचमी (पाचवी माळ): कार्तिकेयांच्या (स्कंद) माता स्कंदमाता हे पाचवे रूप आहे. त्या कमळाच्या आसनावर विराजमान असतात. हे रूप माता आणि बालकाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. रंग पिवळा असून तो चैतन्य, आनंद, सकारात्मक ऊर्जा आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.
षष्ठी (सहावी माळ): महर्षी कात्यायनांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्यांच्या घरी कन्यारूपाने जन्म घेतला, म्हणून त्यांना माता कात्यायनी म्हणतात. हे रूप अतिशय तेजस्वी आणि योद्ध्याचे मानले जाते. रंग हिरवा असून तो निसर्ग, समृद्धी, नवीन सुरुवात आणि वाढीचे प्रतीक मानला जातो.
सप्तमी (सातवी माळ): माता कालरात्री हे माता पार्वतीचे सर्वात उग्र रूप आहे. त्यांचा वर्ण काळा आणि केस मोकळे असतात. अंधकार आणि वाईटाचा नाश करण्यासाठी हे रूप प्रसिद्ध आहे. रंग राखाडी (ग्रे) असून तो संकटांचा सामना करण्याची ताकद आणि कष्टाळू वृत्ती दर्शवतो.
अष्टमी (आठवी माळ): अत्यंत गोऱ्या वर्णामुळे त्यांना महागौरी म्हटले जाते. हे रूप अत्यंत शांत, संयमी आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व असते. रंग जांभळा असून तो अध्यात्म, उच्च विचारसरणी, वैभव आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानला जातो.
नवमी (नववी माळ): नवरात्रीचा शेवटचा दिवस माता सिद्धिदात्री यांना समर्पित आहे. त्या सर्व प्रकारच्या सिद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती करून देणाऱ्या देवी आहेत. रंग मोरपिसी (पिकॉक ग्रीन) असून तो अद्वितीय सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.