भारतीय लष्करात इंटर्नशिपची संधी, विद्यार्थ्यांना ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७' च्या दुसऱ्या आवृत्तीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एआय, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, ड्रोन आणि डेटा ॲनालिसिस क्षेत्रांत लष्कराच्या प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करता येईल.
अभ्यास करता करता देशाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरले जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आहे. 'इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७' ची ही दुसरी आवृत्ती आहे. या कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, ड्रोन आणि डेटा ॲनालिसिस यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत लष्कराच्या प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करता येईल.
या प्रोग्राममध्ये तंत्रज्ञान, संशोधन आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित सुमारे ४३ वेगळे प्रोजेक्ट्स आहेत. त्यात एआय, मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, 5G/6G तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी तसेच फिनटेक आणि हॉस्पिटॅलिटी सिस्टीम यांचा समावेश आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या आणि अभ्यासाच्या विषयाशी जुळणारा प्रोजेक्ट निवडता येईल.
इंटर्नशिप एकूण ७५ दिवसांची असेल. त्यातले ६० दिवस प्रत्यक्ष ऑफिस किंवा फील्ड ट्रेनिंग असेल आणि उरलेले १५ दिवस 'वर्क फ्रॉम होम' असेल.
इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळू शकतो. प्रत्येक प्रोजेक्टनुसार ही रक्कम वेगळी असू शकते. यासाठी किमान ७५ टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
यशस्वी उमेदवारांना AICTE च्या मानकांनुसार १५ शैक्षणिक क्रेडिट्स मिळतील, तसेच भारतीय सैन्याकडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल.
बी.टेक (BTech), बी.ई., कॉम्प्युटर सायन्स, एआय, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीचे शिक्षण घेणारे किंवा नुकतीच पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी यातील वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी पात्र आहेत.
काही अटीही आहेत. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पोलीस पडताळणी करणे बंधनकारक असेल. राहण्याची किंवा येण्या-जाण्याची कोणतीही सोय सैन्याकडून केली जाणार नाही. तसेच ही इंटर्नशिप पूर्ण केली म्हणून सैन्यात नोकरीची गॅरंटी दिली जात नाही.
इच्छुक विद्यार्थ्यांनी AICTE च्या अधिकृत पोर्टलवर, म्हणजे internship.aicte-india.org वर जाऊन आपल्या आवडीच्या प्रोजेक्टसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. प्रत्येक प्रोजेक्टची अंतिम तारीख आणि पात्रतेच्या अटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पोर्टलवरची माहिती नीट वाचून घ्यावी.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.