स्टेट बँक ऑफ इंडियात डिजिटल मार्केटिंग विभागातील उच्च पदांसाठी भरती, २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) डिजिटल मार्केटिंग आणि संप्रेषण विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर ३ रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) डिजिटल मार्केटिंग आणि संप्रेषण विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर काही उच्च पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
या भरती मोहिमेतून एकूण ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यात 'डिप्टी व्हाईस प्रेसिडेंट' (अॅनालिटिकल मार्केटिंग अँड कॅम्पेन), 'डिप्टी व्हाईस प्रेसिडेंट' (डिजिटल मार्केटिंग) आणि 'कंटेंट स्पेशालिस्ट' या पदांचा समावेश आहे.
या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे, त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करावा.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी, उच्च शिक्षण आणि आवश्यक अनुभव असणे अनिवार्य आहे. डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट पदांसाठी वयोमर्यादा ३३ ते ४५ वर्षे ठरवण्यात आली असून किमान १० वर्षांचा अनुभव लागेल. कंटेंट स्पेशालिस्ट पदासाठी वयोमर्यादा २५ ते ४० वर्षे आहे आणि ५ ते ७ वर्षांचा अनुभव मागितला आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वार्षिक पॅकेज (CTC) दिले जाणार आहे. नियुक्ती सुरुवातीला ३ वर्षांच्या कंत्राटावर असेल आणि बँकेच्या गरजेनुसार ती पुढे वाढवली जाऊ शकते.
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://sbi.bank.in/web/careers/current-openings) फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. इतर प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे.