एसबीआय रिसर्चच्या अहवालात नीट यूजी जगातील पाचवी सर्वात मोठी परीक्षा, सुमारे २५ लाख उमेदवार
उमेदवारांच्या संख्येत नीट यूजी पाचव्या स्थानावर आहे, तर चीनची गाओकाओ सुमारे १.२९ कोटी उमेदवारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतातील वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी (NEET UG) ही परीक्षा उमेदवारांच्या संख्येत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. सुमारे २५ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. भारतीय स्टेट बैंकच्या (SBI) 'द स्टेट ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया' या संशोधन अहवालात हे समोर आले आहे.
या अहवालात भारतासह वेगवेगळ्या देशांतील मोठ्या परीक्षांची तुलना केली आहे. त्यात चीनची 'गाओकाओ' ही परीक्षा सर्वाधिक उमेदवारांची ठरली आहे. एसबीआय रिसर्चच्या आकडेवारीनुसार गाओकाओला सुमारे १.२९ कोटी उमेदवार बसतात.
त्यानंतर ब्राझीलच्या ईएनईएममध्ये (ENEM) सुमारे ४८ लाख उमेदवार आहेत. चीनच्या गुओकाओ सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत सुमारे ३० लाख, तर चीनच्याच नॅशनल मास्टर डिग्री एन्ट्रन्स परीक्षेत सुमारे ३४ लाख उमेदवार सहभागी होतात. या यादीत सुमारे २५ लाख उमेदवारांसह नीट यूजी पाचव्या जागी आहे. तुर्किएच्या वायकेएसमध्ये (YKS) सुमारे २४ लाख, नायजेरियाच्या युटीएमईमध्ये (UTME) २२ लाख आणि एसएटी (SAT) मध्ये सुमारे २० लाख उमेदवार असतात.
भारतातल्या परीक्षांचा विचार केला, तर नीट यूजीनंतर युपीएससी (UPSC) या नागरी सेवा भरती परीक्षेला सुमारे १२ लाख उमेदवार बसतात. अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या जेईई मेनला (JEE Main) सुमारे १० लाख, तर उच्च शिक्षणाशी संबंधित पात्रता परीक्षा असलेल्या युजीसी नेटला (UGC Net) सुमारे ८ लाख उमेदवार असतात.
गाओकाओ परीक्षेच्या व्यवस्थेचाही एसबीआय रिसर्चने उल्लेख केला आहे. २०२६ मध्ये सुमारे १.२९ कोटी उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. देशभरात ७,९८१ केंद्रांवर ही परीक्षा झाली. तिथे ३.४८ लाख परीक्षा कक्ष आणि २१,०५० आरक्षित कक्षांची सोय होती. दिव्यांग उमेदवारांसाठी खास सुविधाही ठेवल्या होत्या.
परीक्षेच्या सुरक्षेसाठी सुरक्षित छपाई सुविधा (Secure Printing Facility), २४ तास सीसीटीव्ही निगराणी, प्रश्नपत्रिका नेण्यासाठी बख्तरबंद आणि जीपीएस ट्रॅक केलेली वाहने, पोलीस सुरक्षा आणि सुरक्षित स्टोरेज वापरले जाते. केंद्रांवर विद्यार्थ्यांची ओळख पटवणे आणि प्रतिबंधित वस्तूंची तपासणी कडक पद्धतीने होते. शिवाय परीक्षेच्या काळात वाहतूक व्यवस्थापन, ध्वनी नियंत्रण, अन्न व आरोग्य सुरक्षा आणि हवामानाची स्थिती याकडेही विशेष लक्ष दिले जाते.
मोठ्या परीक्षा घेण्याचा अनुभव लक्षात घेता भारताच्या परीक्षा प्रणालीत काही बदल हवेत, असे अहवालात म्हटले आहे. सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही 'सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा १८६०' अंतर्गत नोंदणी झालेली संस्था आहे. जुलै २०२४ पर्यंत एनटीएने २४० पेक्षा जास्त परीक्षा घेतल्या असून त्यात ५.४ कोटींहून अधिक उमेदवार सहभागी झाले आहेत.
एनटीएच्या कर्मचाऱ्यांबद्दल अहवालात असे नमूद आहे की एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १८ टक्के कर्मचारी कंत्राटी किंवा आऊटसोर्स स्वरूपाचे होते. एनटीएला अधिक मजबूत आणि कायदेशीर चौकट मिळावी यासाठी संसदेमार्फत 'एनटीए कायदा' (NTA Act) करावा, अशी शिफारस एसबीआय रिसर्चने केली आहे.