SBI मध्ये यंदा 12 हजार नोकऱ्या, 250 नव्या शाखाही उघडणार
देशातील सगळ्यात मोठ्या बँकेने यंदा मोठी भरती आणि विस्तार योजना जाहीर केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया यंदा तब्बल 12 हजार नव्या लोकांना नोकरी देणार आहे. बँकेचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी स्वतः ही माहिती दिली. या आर्थिक वर्षात 11 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून यामध्ये क्लर्क आणि ऑफिसर अशा दोन्ही कॅडरचा समावेश असेल.
शेट्टी यांनी सांगितलं की, "आम्हाला निवृत्तीमुळे आणि नवीन गरजांमुळे लोकांची गरज आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीपर्यंत जवळपास 12 हजार भरती पूर्ण करू अशी अपेक्षा आहे." गेल्या वर्षीही SBI ने मोठ्या प्रमाणात भरती केली होती, त्यात 1500 IT स्पेशालिस्ट ऑफिसरचा समावेश होता. त्यामुळे यंदा IT क्षेत्रात तेवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची गरज नाही, पण क्लर्क आणि जनरल ऑफिसर पदांवर मोठी भरती होणार आहे.
मार्च 2026 पर्यंत SBI मध्ये एकूण 2.45 लाख कर्मचारी कार्यरत असून, यामुळे भारतात सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारी कंपनी म्हणून SBI ओळखली जाते. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात SBI ने एकूण 25,633 जणांना नोकरी दिली होती. यामध्ये 4,640 ऑफिसर, 19,340 क्लर्क आणि 1,653 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा आकडा थोडा कमी असला तरी 12 हजार ही संख्या मोठीच आहे.
भरतीबरोबरच बँक आपलं नेटवर्कही वाढवत आहे. शेट्टी यांच्या मते, बँकेचं नेटवर्क आधीच खूप मोठं असलं तरी काही भागांत अजून शाखांची गरज आहे. जिथे नव्या कॉलनी उभ्या राहत आहेत आणि व्यवसाय वाढतोय, अशा ठिकाणी 250 नव्या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. या नव्या शाखांसाठीही नवीन लोकांची गरज लागणार असल्यामुळे सध्याची भरती त्यासाठीही उपयोगी ठरेल. काही जुन्या शाखा बंद करून त्या नव्या ठिकाणी शिफ्ट करण्याचाही बँकेचा विचार सुरू आहे. यामुळे दरवर्षी साधारण 200 ते 250 शाखांची भर पडत राहील.
सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या लाखो तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. SBI मधील नोकरी म्हणजे चांगला पगार, सुरक्षित भविष्य आणि प्रतिष्ठा असं मानलं जातं. त्यामुळे बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, असं सांगितलं जात आहे.
SBI कडून लवकरच याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षेची तारीख याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. सध्या तरी 12 हजार पदांसाठी भरती निश्चित होणार एवढंच स्पष्ट झालं आहे.