आलिया भट्ट आणि भन्साळी पुन्हा 'इन्शाल्लाह'वर काम करण्याच्या तयारीत, अशी चर्चा
सात वर्षांपासून रखडलेला 'इन्शाल्लाह' चित्रपट पुन्हा सुरू करण्याबाबत संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट विचार करत असल्याचं वृत्त आहे.
संजय लीला भन्साळी यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला 'इन्शाल्लाह' हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. सात वर्षांपासून अडकलेल्या या प्रोजेक्टबद्दल नवी माहिती समोर आली असून, भन्साळी आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा या चित्रपटावर काम करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे.
आलिया भट्ट आणि भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'गंगुबाई काठियावाडी'नंतर ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल हेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या तिघांना पडद्यावर पाहण्याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांनी रखडलेल्या 'इन्शाल्लाह'वर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास सात वर्षांपूर्वी या चित्रपटाचं काम सुरू झालं होतं. पण काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट पुढे सरकू शकला नाही. आता इतक्या वर्षांनंतर तो पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा चालू असल्याचं वृत्त आहे. यावेळी चित्रपटाच्या कथानकात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
वृत्तानुसार, 'इन्शाल्लाह'ची मूळ कथा रोमँटिक ड्रामावर आधारित होती. आता भन्साळी आणि आलिया भट्ट कथेत काही बदल करण्याबाबत चर्चा करत आहेत. नव्या आवृत्तीत कथा नेमकी कशी असेल, याबद्दल अजून अधिकृत माहिती आलेली नाही. तसंच आलियासोबत मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता असेल, हेही स्पष्ट झालेलं नाही.
भन्साळी यांनी २०१९ मध्ये 'इन्शाल्लाह' बनवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी आलिया भट्टसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण सलमान खान आणि भन्साळी यांच्यातील मतभेदांमुळे चित्रपट रखडला आणि शेवटी त्याचं काम थांबलं. त्यानंतर भन्साळींनी आलिया भट्टसोबत 'गंगुबाई काठियावाडी' केला. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
'इन्शाल्लाह' नव्या स्वरूपात पुन्हा सुरू झाला, तर आलिया भट्ट आणि भन्साळी यांचा हा एकत्रित तिसरा चित्रपट ठरू शकतो. याआधी दोघांनी 'गंगुबाई काठियावाडी'मध्ये एकत्र काम केलं आहे आणि आता 'लव्ह अँड वॉर'मध्येही ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.
मात्र, 'इन्शाल्लाह'बाबत आलिया भट्ट किंवा संजय लीला भन्साळी यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हा प्रोजेक्ट खरोखर पुन्हा सुरू होणार का आणि त्यात कोणते कलाकार दिसणार, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.