मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

सासवडमध्ये देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र; परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली पाहणी

सासवडमध्ये देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र; परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली पाहणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे उभ्या राहणाऱ्या केंद्राच्या कामाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात, सासवड येथे उभे राहत आहे. परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली. केंद्र दर्जेदार, अत्याधुनिक आणि प्रभावी व्हावे, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी एकूण तीन कामांचा आढावा घेतला. त्यात स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र (Automated Testing Station - ATS), स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (Automated Driving Testing Track - ADTT) आणि प्रस्तावित रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्था यांचा समावेश होता.

हा प्रकल्प सासवड येथील २५ एकर जागेवर उभारला जात आहे. त्यामुळे गाड्यांची तांत्रिक तपासणी आणि चालकांची चाचणी जास्त पारदर्शक, अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने होईल, असे सांगण्यात आले. स्वयंचलित चाचणी केंद्रात सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने गाड्यांचे ब्रेक, सस्पेन्शन, दिवे आणि उत्सर्जन तपासले जाईल. त्यामुळे गाडीच्या फिटनेस तपासणीला लागणारा वेळ कमी होईल आणि रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या अधिक सुरक्षित होतील.

चालकांसाठीच्या स्वयंचलित चाचणी मार्गावर ८ आकाराचा मार्ग, एच आकाराचा मार्ग, चढ-उतार आणि वळणांचे ट्रॅक असतील. अशा वेगवेगळ्या चाचण्यांमधून चालकांच्या कौशल्याचे मूल्यमापन केले जाईल. या चाचण्या आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या साहाय्याने घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे चालकांना परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह होईल, असे सांगण्यात आले.

राज्य रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेतून मोटार वाहन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आधुनिक तंत्रज्ञान, बदलते मोटार वाहन कायदे, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन हे या प्रशिक्षणाचे विषय आहेत. यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि रस्ता सुरक्षेशी संबंधित कामकाज जास्त प्रभावीपणे चालेल.

यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "रस्ते अपघात कमी करण्यासाठी केवळ नियमांची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सासवड येथील हे केंद्र देशासाठी आदर्श ठरेल, अशा दर्जाने उभारले पाहिजे."

या केंद्रामुळे गाड्यांची सुरक्षितता, चालकांचे कौशल्य आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या रस्ता सुरक्षा क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे सांगण्यात आले.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ