रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:35 IST

संजय राऊत यांचा दावा: मोदी मार्चपर्यंत सत्तेवर राहणार नाहीत, भाजपच्या निधीवरही सवाल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांचा दावा: मोदी मार्चपर्यंत सत्तेवर राहणार नाहीत, भाजपच्या निधीवरही सवाल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सध्या ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. दिल्ली आणि मुंबईत पोलीस आंदोलकांना मोठ्या संख्येने ताब्यात घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या कारवायांमुळे लोकांमध्ये रोष व्यक्त होत असून, विरोधक केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

रविवारी, 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी येत्या मार्च महिन्यापर्यंत सत्तेवर राहणार नाहीत, असे भाकीत त्यांनी केले. येत्या सहा ते सात महिन्यांत मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील, असेही राऊत म्हणाले.

भाजपमधील कथित अंतर्गत मतभेदांचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. भाजपचे चार मोठे नेते सध्या वेगळ्या मनस्थितीत आहेत आणि त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका मोठ्या नेत्याचाही समावेश आहे, असा दावा त्यांनी केला. पुढच्या काळात भाजपमधले अनेक नेते मोदी आणि शाह यांच्यापासून दूर जातील, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनावरून आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हा विषय फक्त एका संघटनेपुरता मर्यादित नाही, तर तो देशातील लोकशाहीशी जोडलेला आहे, असे ते म्हणाले.

दिल्ली पोलीस माजी मुख्यमंत्री आणि खासदारांना ताब्यात घेत आहेत, असा आरोप करत देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका राऊत यांनी केली. मोदी आणि शाह यांच्या निवासस्थानांभोवती कडक सुरक्षा व्यवस्था आहे, याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

मुंबईतील आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अटक करण्यात आली. या मुद्द्यावरही राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तुषार गांधी यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपला मिळणाऱ्या निधीबद्दलही राऊत यांनी सवाल केले. भाजपला कोणाकडून आर्थिक मदत मिळाली, याची माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी करत त्यांनी पीएम फंड आणि मतचोरीच्या आरोपांचाही उल्लेख केला.

राऊत यांनी केलेला मोदी यांच्या सत्तेबाबतचा दावा, भाजपमधील कथित मतभेद आणि निधीबाबतचे आरोप यावर भाजपची काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ