Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; 'बिग बॉस २०'मध्ये केलं भरभरून कौतुक
'द व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया 'बिग बॉस २०'च्या 'वीकेंड का वार'मध्ये पोहोचले होते, तेव्हा सलमान खानने तमन्नाच्या आवाजाचं भरभरून कौतुक केलं.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या त्यांच्या आगामी 'द व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून दोघेही 'बिग बॉस २०'च्या 'वीकेंड का वार' या भागात पोहोचले होते. या भागात दोघांनीही चित्रपटाबद्दल गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी मंचावर तमन्ना बोलत असताना सलमान खानने अचानक सिद्धार्थ मल्होत्राकडे पाहिलं आणि तमन्नाच्या आवाजाचं कौतुक केलं.
"काय अप्रतिम आवाज आहे तिचा यार," असं सलमान म्हणाला. सलमानकडून अचानक झालेलं हे कौतुक ऐकून तमन्ना लाजली आणि तिने त्याचे आभार मानले. सलमानच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे मंचावरचं वातावरणही हलकंफुलकं झालं आणि तिथे उपस्थित सगळ्यांनाच हा क्षण आवडला.
चित्रपटातील 'छठ' हे गाणं आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. याशिवाय 'समझो ना' हे गाणंही सध्या चर्चेत आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, विविध भाषांमध्ये हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड झाल्याचं सांगितलं जात आहे. गाण्यातील सिद्धार्थ आणि तमन्नाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि सोशल मीडियावर याबद्दल सतत चर्चा सुरू आहे.
यासोबतच चित्रपटातील 'छठी मैया' या गाण्यात तमन्नाने छठ पूजेच्या विधींचं केलेलं सादरीकरणही सध्या चर्चेत आहे. या गाण्यातून तमन्नाने साकारलेली छठ पूजेची झलक प्रेक्षकांना विशेष भावली आहे.
'द व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट' हा मायथो-फँटसी-थ्रिलर प्रकारातला चित्रपट असून यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहेत. हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि सिद्धार्थ-तमन्नाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.