सैमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी मोटोरोला सज्ज, 200MP कॅमेऱ्यासह नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन येणार
मोटोरोला सिग्नेचर 27 या नावाने कंपनीचा नवा 5G फ्लॅगशिप स्मार्टफोन येणार असून लाँचआधीच त्याचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
मोटोरोला कंपनी लवकरच आपला नवा फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या आगामी स्मार्टफोनला Motorola Signature 27 असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन समिटमध्ये या फोनची पहिली झलक दाखवली होती. या समिटमध्ये कंपनीने हा आत्तापर्यंतचा सर्वात ॲडव्हान्स्ड स्मार्टफोन असल्याचं सांगत, यात कंपनीची आजवरची सर्वोत्तम कॅमेरा सिस्टिम असणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच बाजारात बँग अँड ओल्युफसन कंपनीचा ऑडिओ असणारा हा एकमेव स्मार्टफोन असेल, असंही कंपनीने त्या वेळी सांगितलं होतं. या फोनमध्ये नवा स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 प्रोसेसर दिला जाणार असून यामुळे फोनला आतापर्यंत न पाहिलेला स्पीड मिळेल, असा दावाही कंपनीने केला आहे.
कंपनी हा फोन प्रीमियम फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्नॅपड्रॅगनच्या लेटेस्ट प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये या फोनचा समावेश होणार आहे. यामुळे या डिव्हाईसची थेट स्पर्धा सैमसंग, एप्पल आणि शाओमी या ब्रँड्सच्या प्रीमियम फोनसोबत होणार आहे. फोन बाजारात येण्याआधीच त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
मोटोरोला सिग्नेचर 27 मध्ये 2nm स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेट वापरण्यात येणार आहे. एवढ्या हाय-परफॉर्मन्स प्रोसेसरमुळे फोनमध्ये उष्णता नियंत्रणासाठी कंपनीने नवी ArcticMesh कूलिंग सिस्टिम दिली आहे. यामध्ये डायमंड-इन्फ्यूज्ड थर्मल जेल, लिक्विड मेटल, कॉपर मेश आणि 3D वेपर चेंबर यांचा समावेश आहे. हाय-एंड गेमिंग, एआय प्रोसेसिंग आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंगसारख्या कामांदरम्यान फोनचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ही सिस्टिम मदत करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फोनच्या मागील पॅनलवर पारंपरिक मोठ्या कॅमेरा बंपऐवजी क्लस्टर्ड मल्टी-सेन्सर डिझाईन दिसणार आहे, म्हणजे मागच्या बाजूला एक मोठा बंप न देता कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी गुच्छाच्या स्वरुपात मांडलेले दिसणार आहेत.
कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर, मोटोरोला सिग्नेचर 27 मध्ये मोठं अपग्रेड पाहायला मिळणार आहे. फोनमध्ये 50MP सोनी लायटिया 910 हा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. यासोबतच तब्बल 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेराही दिला जाणार आहे. या कॅमेरा सेटअपमुळे मोटोरोला थेट कॅमेरा-सेंट्रिक प्रीमियम स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे.
डिझाईनबाबत बोलायचं तर, सिग्नेचर 27 मध्ये मोटोरोलाच्या सध्याच्या डिझाईन शैलीत काही बदल दिसून येतात. फोनमध्ये टेक्सचर्ड फिनिश असणार आहे. हा फोन पँटोन कोल स्मोक आणि पँटोन कॅप्युलेट ग्रीन या दोन रंगपर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.