आमदार सांस्कृतिक महोत्सवातील रास गरबा-दांडिया स्पर्धेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सडक अर्जुनी येथे आमदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त झालेल्या रास गरबा-दांडिया स्पर्धेला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली. गोंदियासह नागपूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा येथील चमूंनी भाग घेतला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सडक अर्जुनी, दि. २३ : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात सांस्कृतिक रंग भरत आमदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रास गरबा-दांडिया स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवरात्रोत्सवाचा उत्साह आधीच होता, त्यात या स्पर्धेमुळे सांस्कृतिक रंग आणखी खुलले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी लॉनसमोरच्या प्रांगणात ही स्पर्धा आयोजित केली होती. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, तालावर थिरकणाऱ्या नृत्याच्या आकर्षक हालचाली आणि ढोल-तालाचा गजर यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला होता. स्पर्धा बघायला हजारो प्रेक्षक आल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप आले.
या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यासह नागपूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा येथील अनेक चमूंनी भाग घेतला. स्पर्धकांनी उत्कृष्ट नृत्यकौशल्य आणि आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक चमूच्या सादरीकरणाला प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत होते. पारंपरिक गरबा-दांडियाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागांतील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. त्यामुळे ही स्पर्धा फक्त मनोरंजनापुरती न राहता सांस्कृतिक एकात्मतेलाही महत्त्व देणारी ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आणि माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले होते. मंचावर पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी आणि चंद्रकला डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष रजनीताई गिरेपुंजे, भाजप तालुका मंडळ अध्यक्ष राजेश कठाणे, भाजप महिला अध्यक्ष शितलताई गौर, शेषराव गिरेपुंजे, पंचायत समिती सदस्य वर्षा शहारे, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, नगरपंचायत सभापती कमलादेवी अग्रवाल, नगरपंचायत सदस्य महेंद्र वंजारी, नगरसेविका शशिकला टेंभुर्णे, दीक्षाताई भगत, रजनी परिहार, रेणू अग्रवाल, शिवसेना तालुका अध्यक्ष विलास कापगते, सरपंच प्रशांत बालसंवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिताताई कापगते, विनोद बारसागडे, लक्ष्मीकांत तागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण विक्की सय्याम आणि प्रियंका कोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हितेश डोंगरे यांनी केले, तर जितेंद्र मेश्राम आणि मुन्ना राऊत यांनी संचालन केले.
आमदार सांस्कृतिक महोत्सवामुळे स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. या उपक्रमाने नवरात्रोत्सवाचा आनंद दुणावला आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासही हातभार लागला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच निसर्ग फाउंडेशन, सडक अर्जुनीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.