सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या स्पिनी कंपनीचा 3000 कोटींचा IPO येणार
जुन्या गाड्या विकणारी कंपनी स्पिनीने सेबीकडे कागदपत्र जमा केली असून 2027 मध्ये लिस्टिंगचं लक्ष्य आहे.
क्रिकेटच्या मैदानावर षटकार मारणारा सचिन तेंडुलकर आता बिझनेसमध्येही जोरदार खेळी करताना दिसतोय. सचिनने ज्या कंपनीत पैसे गुंतवले होते त्याच कंपनीचा आयपीओ आता शेअर बाजारात येणार आहे. जुन्या गाड्या विकणारी कंपनी स्पिनीने शेअर बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी सेबीकडे आवश्यक कागदपत्रं जमा केली आहेत.
या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला जवळपास 2500 ते 3000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. मात्र सेबीची परवानगी मिळाल्यानंतरच नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. कंपनी काही नवीन शेअर्स काढून पैसे उभारणार आहे, आणि त्याचबरोबर जुने गुंतवणूकदार त्यांचे काही शेअर्स विकणार आहेत. शेअर्स विकण्याच्या या पद्धतीला ओएफएस म्हणजेच ऑफर फॉर सेल असं म्हणतात. यामुळे कंपनीलाही पैसा मिळेल आणि जुन्या गुंतवणूकदारांनाही नफा कमावून बाहेर पडण्याची संधी मिळेल.
या आयपीओचं काम कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटीग्रुप, मॉर्गन स्टॅनले आणि 360 वन या मोठ्या कंपन्यांकडे सोपवण्यात आलं आहे. कंपनीचं लक्ष्य 2027 मध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्याचं आहे, पण त्याची नेमकी तारीख अजून जाहीर झालेली नाही. ऑगस्ट 2026 मध्ये कंपनीने स्वतःचं स्वरूप प्रायव्हेट लिमिटेडमधून पब्लिक लिमिटेडमध्ये बदललं. तसंच स्पिनीच्या मुख्य कंपनीचं नावही बदलून व्हॅल्यू ड्राईव्ह टेक्नॉलॉजी असं करण्यात आलं आहे.
कंपनीचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. कागदपत्रांनुसार 2025 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 25 टक्क्यांनी वाढला आहे. 2024 मध्ये कंपनीने 3730 कोटी रुपये कमावले होते, तर 2025 मध्ये हाच आकडा 4657 कोटींवर पोहोचला. 2026 मध्ये हा आकडा 6000 कोटींच्या पुढे जाऊ शकतो असं बोललं जात आहे.
सचिन तेंडुलकर हा फक्त या कंपनीची जाहिरात करणारा चेहरा नाही, तर तो कंपनीतला एक गुंतवणूकदारही आहे. सचिनने 2021 मध्येच स्पिनीमध्ये पैसे गुंतवले होते आणि त्यानंतर तो कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर बनला. सचिनशिवाय टायगर ग्लोबल आणि ॲक्सेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांनीही स्पिनीमध्ये गुंतवणूक केली आहे.
स्पिनीची सुरुवात 2015 मध्ये झाली. नीरज सिंग, मोहित गुप्ता आणि रामांशू माथूर या तिघांनी मिळून ही कंपनी उभी केली. नीरज सिंग सध्या कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी फक्त जुन्या गाड्या विकत नाही, तर गाडी घेण्यापासून विकण्यापर्यंत, त्यावर लोन देणं, विमा काढून देणं आणि गाडी विकल्यानंतर सर्व्हिस देणं अशी सगळी कामं करते. याला फुल स्टॅक मॉडेल असं म्हणतात.
ट्रूबिल, गोमेकॅनिक आणि ऑटोकार इंडिया या कंपन्या विकत घेऊन स्पिनीने आपला व्यवसाय आणखी मोठा केला आहे. सध्या ही कंपनी 25 शहरांमध्ये काम करते आणि दर महिन्याला 15,000 गाड्या विकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या विकणारी ही देशातली एक मोठी कंपनी बनली आहे.