दोन्ही देशांच्या आपत्कालीन ॲप्सवर सायबर हल्ला; मोबाईलवर किरणोत्सर्गाच्या खोट्या सूचना
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय आपत्कालीन सूचना प्रणालींवर सायबर हल्ले झाले असून नागरिकांच्या मोबाईलवर रासायनिक, किरणोत्सर्गी आणि अणुहल्ल्याच्या खोट्या सूचना आल्या.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता फक्त रणांगणापुरते राहिलेले नाही. डिजिटल आणि सायबर क्षेत्रातही ते गंभीर वळणावर पोहोचले आहे. दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय राजनैतिक आणि मानवतावादी चर्चेचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दोन्ही देशांच्या राष्ट्रीय आपत्कालीन सूचना प्रणालींवर (Emergency Alert Systems) मोठे सायबर हल्ले झाल्याचे समोर आले आहे.
या हॅकिंगमुळे लोकांच्या मोबाईलवर रासायनिक, किरणोत्सर्गी आणि अणुहल्ल्याच्या खोट्या सूचना अचानक दिसू लागल्या. त्यामुळे दोन्ही देशांतील सामान्य लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
युक्रेनच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील नागरिकांना हवाई हल्ल्यांची आधी सूचना देणारे अधिकृत "एअर रेड अलर्ट" (Air Raid Alert) ॲप शत्रूकडून हॅक करण्यात आले. त्यानंतर लाखो युक्रेनियन नागरिकांच्या फोनवर कीव्ह आणि आसपासच्या परिसरात "किरणोत्सर्गाचा धोका" (Radiation Threat) आणि "रासायनिक हल्ल्याची शक्यता" असल्याच्या आपत्कालीन सूचना झळकल्या. एवढेच नाही, तर कीव्हच्या रस्त्यांवर बसवलेल्या लाऊडस्पीकर सिस्टीममधूनही काही वेळ अस्वस्थ करणारे संदेश प्रसारित झाले. त्यामुळे रस्त्यांवर गोंधळ उडाला होता.
या प्रकारानंतर युक्रेनच्या हवाई दलाने (Ukrainian Air Force) लगेचच आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवरून खुलासा केला. हवाई दलाने म्हटले की, "एअर अलर्ट ॲपच्या प्रणालीत बाहेरून हस्तक्षेप करून छेडछाड करण्यात आली आहे. देशात कोणत्याही प्रकारचा किरणोत्सर्ग किंवा रासायनिक धोका निर्माण झालेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि घाबरू नये." दुसरीकडे, युक्रेनच्या डिजिटल परिवर्तन मंत्रालयाने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून सांगितले की, मुख्य राष्ट्रीय सतर्कता प्रणाली सुरक्षित असून पूर्वीप्रमाणे सामान्यपणे सुरू आहे.
रशियाच्या बाजूलाही असाच प्रकार घडला. रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या (Ministry of Emergency Situations) मोबाईल ॲप्लिकेशनवरही एकाच वेळी मोठा सायबर हल्ला करण्यात आला. हॅकर्सनी या सरकारी ॲपचा गैरवापर करून रशियन नागरिकांना संभाव्य सुरक्षा धोक्याबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पाठवली. रशियन प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्रणालीतील त्रुटी दूर करण्याचे आणि हॅकिंग कुठून झाले याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.
या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही एक महत्त्वाचे विधान केले. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. सुरू असलेल्या संघर्षाचा जागतिक ऊर्जा बाजारावर आणि इंधनाच्या किमतींवर गंभीर परिणाम होत आहे, असे त्यांनी म्हटले. एका मुलाखतीचा संदर्भ देत झेलेन्स्की यांनी सांगितले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी या जागतिक परिणामांचा विचार करून दोन्ही देशांत "ऊर्जा युद्धविराम" (Energy Ceasefire) घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे निदान ऊर्जा पायाभूत सुविधांवरचे हल्ले तरी थांबवता येतील.
या घटनांवरून भविष्यातील युद्ध फक्त क्षेपणास्त्रांनी लढले जात नाही, तर डिजिटल माहितीच्या जोरावर नागरिकांचे मनोधैर्य खच्ची करूनही लढले जात आहे, हे दिसते. सध्या दोन्ही बाजूंच्या सुरक्षा यंत्रणा आपले सायबर ग्रिड अधिक मजबूत करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.