मार-ए-लागोजवळ लिअरजेट विमान कोसळले, सर्व ९ जणांचा मृत्यू
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
फ्लोरिडातील पाम बीच काउंटीत रविवारी लिअरजेट ६० कोसळले. विमानातील सर्व ९ जण दगावल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. पाम बीच काउंटीमधील क्रेस्टहेवन परिसरात 'लिअरजेट ६०' (Learjet 60) हे व्यावसायिक विमान कोसळले. विमानात एकूण ९ जण होते आणि त्या सर्वांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विमान खाली आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगही लागली.
ही दुर्घटना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो (Mar-a-Lago) निवासस्थानापासून नऊ मैल म्हणजे सुमारे १४ किलोमीटर अंतरावर झाली. त्या दिवशी ट्रम्प स्वतः मार-ए-लागो येथे होते. अपघाताच्या एक तास आधी, सकाळी ११:५५ वाजता, ते जवळच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 'एअर फोर्स वन' विमानाने रवाना झाले होते.
याच दरम्यान अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने ट्रम्प यांच्या पाम बीच येथील निवासस्थानाभोवती हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली होती. 'एएन/टीडब्ल्यूक्यू-१ अव्हेंजर शॉर्ट-रेंज एअर डिफेन्स सिस्टम्स' (SHORADS) बसवण्यात आल्या आहेत. ड्रोन आणि इतर संभाव्य हवाई धोक्यांपासून राष्ट्राध्यक्षांचे संरक्षण करणे, हा त्यामागचा हेतू सांगितला गेला आहे. ही यंत्रणा बसवल्यानंतर काही तासांतच विमान कोसळल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. मात्र, विमान अपघात आणि वाढवलेली सुरक्षा यांचा आपसात कोणताही संबंध नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील संभाषणांवरून असे दिसते की, अपघातापूर्वी या विमानाला अत्यंत खराब हवामानाचा सामना करावा लागला. हवेचे तीव्र झोत (turbulence) आणि साचलेला बर्फ यामुळे विमानावरील नियंत्रण बिघडले होते. पायलटने कंट्रोल रूमला कळवले की, हवेच्या झोतांमुळे विमान सुमारे ७०० फूट वर-खाली होत आहे. सुरक्षिततेसाठी आणखी २,००० फूट वर जाण्याची परवानगीही पायलटने मागितली होती.
त्यानंतर काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि विमान विक्रमी वेगाने खाली येऊ लागले. पायलटने 'मेडे, मेडे' (Mayday) अशी मदतीसाठी हाक दिली. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या शेवटच्या संभाषणात पायलटने सांगितले की, विमान प्रति मिनिट तब्बल १०,००० फूट वेगाने खाली उतरत आहे आणि ते थेट जमिनीवर आदळणार आहे. त्यानंतर थोड्याच वेळात विमान कोसळले.
'अव्हेंजर' ही मोबाईल म्हणजे फिरती, कमी पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा आहे. ती ३६० अंशांत फिरू शकते आणि स्टिंगर क्षेपणास्त्रांच्या मदतीने कोणत्याही हवाई धोक्याचा अचूक मुकाबला करण्यास सक्षम आहे, असे सांगितले जाते.
या घटनेमुळे विमान वाहतूक सुरक्षा आणि व्हीआयपी सुरक्षा हे दोन्ही प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. फेडरल एव्हिएशन प्रशासन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) हे दोघे मिळून या अपघाताची कसून चौकशी करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.