कोरड्या त्वचेसाठी घरच्या घरी बनवा नारळाच्या पाण्याचा फेस मिस्ट
ऊन, धूळ, प्रदूषण आणि रोजच्या धावपळीमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळी घरच्या घरी नारळाच्या पाण्यापासून तयार केलेला फेस मिस्ट त्वचेला फ्रेश आणि तुकतुकीत ठेवण्यास मदत करू शकतो.
दिवसभर ऊन, धूळ, प्रदूषण आणि धावपळीचा सामना करावा लागल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर याचा परिणाम स्पष्ट दिसतो. त्वचा हळूहळू कोरडी आणि निर्जीव होत जाते. त्वचा हे आपलं सौंदर्य आहे आणि ते टिकवण्यासाठी थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं ठरतं. कोरड्या त्वचेची समस्या आपोआप बरी होईल, असं जर कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयोगी पडू शकतात आणि त्यासाठी नेहमी खर्चिक गोष्टींची गरज नसते, फक्त योग्य पद्धत माहीत असणं गरजेचं आहे. नारळाच्या पाण्यापासून घरीच तयार करता येणारा हा DIY फेस मिस्ट कोरड्या त्वचेला फ्रेश आणि तुकतुकीत ठेवायला मदत करतो.
हा फेस मिस्ट बनवण्यासाठी अर्धा कप ताजं नारळाचं पाणी, एक मोठा चमचा गुलाब पाणी, एक चमचा कोरफड जेल, व्हिटॅमिन ई तेलाचे दोन ते तीन थेंब आणि टी ट्री तेलाचे दोन ते तीन थेंब इतकं साहित्य लागतं. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी टी ट्री तेल वापरण्याआधी त्वचेवर आधी पॅच टेस्ट करून घ्यावी. यातल्या कोणत्याही साहित्यामुळे त्रास होत असेल तर ते साहित्य मिस्टमध्ये टाळावं.
फेस मिस्ट बनवण्याची पद्धत साधी आहे. आधी एका भांड्यात नारळाचं पाणी घ्यायचं. त्यात गुलाब जल आणि कोरफड जेल मिक्स करायचं. सगळं साहित्य नीट एकत्र झालं की त्यात व्हिटॅमिन ई आणि टी ट्री तेलाचे थेंब टाकून पुन्हा चांगलं मिक्स करायचं. हे तयार झालेलं द्रावण बारीक चाळणीतून किंवा कापडातून गाळून घ्यायचं आणि स्प्रे बॉटलमध्ये भरायचं. चेहऱ्यावर लावण्याआधी काही वेळ हा मिस्ट फ्रिजमध्ये ठेवून थंड करता येतो, ज्यामुळे त्वचेला थंडगार आणि फ्रेश फिलिंग मिळतं. चेहऱ्यावर स्प्रे केल्यानंतर हातानं अलगद काही सेकंद मसाज करायचा.
नारळाचं पाणी आणि कोरफड जेल त्वचा हायड्रेट ठेवण्याचं काम करतात, यामुळे त्वचेला फ्रेशनेस मिळतो आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. शिवाय हा मिस्ट घरीच बनत असल्यामुळे पैसेही वाचतात.
काही गोष्टींची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. यात नैसर्गिक नारळाचं पाणी वापरलेलं असल्यामुळे ही बॉटल बाहेर न ठेवता फ्रिजमध्येच ठेवावी. चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करून घ्यावी. जळजळ होणं किंवा त्वचा लालसर होणं असा त्रास जाणवला तर याचा वापर टाळावा.