रेपो दर ५.५० टक्क्यांवर: कर्जदारांना झटका, FD करणाऱ्यांना फायद्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची वाढ केल्याने EMI वाढणार आहेत, तर बँका FD चे व्याजदर वाढवू शकतात.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो दर ५.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेले काही दिवस या निर्णयाबद्दल सगळ्यांच्या मनात धाकधूक होती आणि ती बातमी सकाळी आली. या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका कर्ज घेतलेल्यांना बसला आहे, कारण रेपो दरातील वाढ म्हणजे कर्जाचा खर्च वाढणार.
रेपो दर वाढला म्हणजे EMI मध्येही वाढ होणार आहे. ज्यांनी कार कर्ज, गृह कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलेले आहे, त्यांना आता आधीपेक्षा जास्त रक्कम EMI साठी भरावी लागू शकते. म्हणजेच दर महिन्याच्या बजेटवर थेट ताण येण्याची शक्यता आहे.
पण या निर्णयाची एक दुसरी बाजूही आहे. कर्जदारांना झटका बसला असला, तरी गुंतवणूकदारांसाठी ही बातमी आनंदाची ठरू शकते. तुम्ही FD काढण्याचा विचार करत असाल किंवा आधीच FD काढली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेपो दराच्या या निर्णयाचा परिणाम बँकांच्या व्याजदरांवरही होऊ शकतो, कारण बँका पुढच्या काळात FD वरील व्याजदर वाढवू शकतात. त्याचा फायदा FD करणाऱ्यांना मिळू शकतो.
बँकांनी FD चे दर वाढवले, तर नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना आधीपेक्षा जास्त व्याज मिळू शकते. म्हणजेच जे लोक FD मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहेत, त्यांना वाढलेल्या व्याजदरांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
आता प्रश्न असा की, बँका FD चे व्याजदर नेमके कधी वाढवणार? अहवालानुसार, बँका येत्या काही दिवसांत ते काही आठवड्यांत FD चे व्याजदर वाढवायला सुरुवात करू शकतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे सण येत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात बँका खास FD योजना आणू शकतात आणि वाढीव व्याजदर जाहीर करू शकतात.
म्हणून FD काढायचा विचार असेल, तर आधी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला FD मध्ये मोठी रक्कम ठेवायची असेल, तर बँकांनी व्याजदर वाढवेपर्यंत काही आठवडे थांबा आणि त्याचा फायदा घ्या. व्याजदर वाढल्यानंतर गुंतवणूक केली, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळेल.
दुसरीकडे, रेपो दरातील वाढीमुळे कर्जदारांना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्जावरील व्याजदर वाढल्याने त्यांचे EMI वाढू शकतात आणि त्यांना आधीपेक्षा जास्त EMI भरावे लागू शकतात. थोडक्यात, एकीकडे FD वर व्याज वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे त्याचा परिणाम कर्जदारांच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो.