भारतीय गोलंदाजांची कमाल, झिम्बाब्वेचे भारतासमोर 8 बाद 103 धावांचे आव्हान
रायपूरमध्ये सुरू असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 8 बाद 103 धावांचे आव्हान ठेवले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियमवर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात झिम्बाब्वेच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करून 8 बाद 103 धावा केल्या आणि भारतासमोर 103 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय महिला संघाची गोलंदाजी या सामन्यात सर्वोत्कृष्ट ठरली. सामन्यातील पहिल्या चेंडूपासूनच भारतीय खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड ठेवली होती.
झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकून त्यांनी तशीच काहीशी कामगिरी करण्याच्या हेतूने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मागच्या सामन्यात 42 धावा करणारी केलीस एनधलोवू यावेळी खातेही उघडू शकली नाही. नंदनी शर्माने तिला त्रिफळाचीत करून चौथ्याच षटकात झिम्बाब्वेला जबर धक्का दिला.
त्यानंतर दोन षटकांनी दीप्ति शर्माने बिलव्हड बिझा (7) हिला हरमनप्रीत कौर यांच्याकरवी झेलबाद करून तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यात 43 धावा करणारी शेरन मेयर्स या सामन्यात फक्त 9 धावांचे योगदान देऊ शकली. क्रांती गौडची ती शिकार ठरली.
अशा पडझडीनंतर मधल्या काळात चिपो मुग्री टिरीपानो आणि कर्णधार जोसेफिन कोमो (नाबाद 27) यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला.
निकी प्रसादने यष्टीमागे ऋचा घोष यांच्याकरवी चिपोला बाद केले. चिपोने 5 चौकारांसह 34 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यासा ग्वान्झुरूला निकीने त्रिफळाचीत केले आणि तिला आपले खातेही उघडू दिले नाही. भारताकडून निकीने 2 षटकांत 7 धावा देऊन 2 गडी बाद केले.
भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.
झिम्बाब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.