केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ब्राझीलचे फुटबॉलपटू रोनाल्डो नाझारियो यांची भेट
रोनाल्डो सध्या एका स्पोर्ट्स इव्हेंटसाठी भारत दौऱ्यावर असून, याच काळात खडसे यांनी त्यांची भेट घेतली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ब्राझीलचा महान फुटबॉलपटू आणि विश्वविजेता रोनाल्डो नाझारियो यांची भेट घेतली. या भेटीची माहिती खडसे यांनी स्वतः सोशल मीडियावरून दिली आहे.
खडसे यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आर-9 आणि जिरो फेनोमेनो (द फेनोमेनन) या नावांनी प्रसिद्ध असलेले ब्राझीलचे स्ट्रायकर रोनाल्डो नाझारियो यांच्यासोबतची ही भेट अविस्मरणीय होती. रोनाल्डो हे दोन वेळचे विश्वचषक विजेते असून फुटबॉलच्या इतिहासातील ऑल-टाइम ग्रेट खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांचा हा सुंदर प्रवास येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे खडसे म्हणाल्या की, अशा प्रकारच्या चर्चांमुळे एक बळकट क्रीडा परिसंस्था (स्पोर्टिंग इकोसिस्टम) तयार करण्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. अशी परिसंस्था तरुण भारतीय प्रतिभेला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवते.
रोनाल्डो सध्या एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत. याच काळात रक्षा खडसे यांनी त्यांची भेट घेतली. 18 सप्टेंबर 1976 रोजी ब्राझीलमधील रियो दि जिनेरियो येथे जन्मलेल्या रोनाल्डो यांना केवळ ब्राझीलच नव्हे, तर फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक मानले जाते.
स्ट्रायकर म्हणून खेळणारे रोनाल्डो 1994 आणि 2002 मधील विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझील संघाचा भाग होते. 2002 चा विश्वचषक ब्राझीलला जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू तेच ठरले होते. त्यांनी 7 सामन्यांत 8 गोल केले होते. तसेच 1994 ते 2011 या कालावधीत ब्राझीलसाठी खेळलेल्या 98 सामन्यांत रोनाल्डो यांनी 62 गोल केले आहेत.
क्लब करिअरमध्ये रोनाल्डो यांनी बार्सिलोना, इंटर मिलान, रिअल माद्रीद आणि एसी मिलान यांसारख्या मोठ्या क्लबकडून खेळण्याचा अनुभव घेतला आहे. 1993 पासून 2011 पर्यंतच्या क्लब करिअरमध्ये खेळताना त्यांनी एकूण 384 सामन्यांत 280 गोल केले आहेत. म्हणजेच ब्राझीलसाठी 98 सामन्यांत 62 गोल आणि क्लबकडून 384 सामन्यांत 280 गोल, अशी त्यांची आकडेवारी आहे.
रोनाल्डो यांना तीन वेळा फीफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इअर म्हणून निवडण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांनी दोन वेळा बॅलन डी ओर पुरस्कारही पटकावला आहे. ब्राझीलचे हे दिग्गज स्ट्रायकर भविष्यातील फुटबॉलपटूंसाठी नेहमीच आदर्श राहिले आहेत.