राधाष्टमीला घरात आणा या ५ गोष्टी, सुख-समृद्धी नांदेल
राधाष्टमीनिमित्त घरात कोणत्या वस्तू आणणं शुभ मानलं जातं, याबद्दलची माहिती.
राधाअष्टमी हा सण प्रेम, भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार राधा राणी ही भगवान कृष्णावरील अतूट प्रेम आणि त्यागाचं प्रतीक समजली जाते. कृष्णाच्या नावाआधी राधेचं नाव घेतल्याने भक्ती पूर्ण होते, अशी मान्यता आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीला राधाअष्टमी साजरी केली जाते आणि याच दिवशी राधा राणी प्रकट झाल्या होत्या, असं मानलं जातं. या दिवशी भक्त उपवास करतात, राधा-कृष्णाचं ध्यान करतात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. तसंच काही ठराविक वस्तू घरात आणणं शुभ मानलं जातं.
वैदिक पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १:०२ वाजता सुरू झाली आणि शनिवार, १९ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२८ वाजता संपली. त्यामुळे उदयतिथीनुसार राधाअष्टमी शनिवार, १९ सप्टेंबरला साजरी होणार आहे.
राधाअष्टमीचा उपवास आणि पूजा केल्याने माणसाच्या आयुष्यात भक्ती, प्रेम आणि सौभाग्य वाढतं, असं मानलं जातं. जो भक्त हा उपवास पाळतो, त्याला अखंड सौभाग्य, सुख आणि समृद्धी मिळते, तसंच भक्तीच्या मार्गावर स्थिरता आणि कृष्णाची कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे. जो कोणी राधा-राधा असा जप करतो, त्याच्याकडे कृष्ण आपोआप येतो असंही मानलं जातं. या उपवासामुळे वैवाहिक आयुष्यात प्रेम, सुसंवाद आणि गोडवा येतो, तसंच संततीप्राप्तीचा आनंदही मिळतो, अशी धारणा आहे.
आता राधाअष्टमीच्या दिवशी घरात कोणत्या शुभ वस्तू आणाव्यात, ते पाहूया. सर्वात आधी मोराचं पीस. हे घरी आणल्याने सकारात्मकता आणि शांती लाभते, अशी श्रद्धा आहे. राधा-कृष्णाच्या चित्राजवळ हे पीस ठेवून त्याची पूजा करता येते.
दुसरी वस्तू म्हणजे मोराचं पीस लावलेली बासरी. बासरी ही प्रेम आणि गोडव्याचं प्रतीक मानली जाते. पूजाघरात राधा-कृष्णाजवळ बासरी ठेवल्याने घरातलं प्रेम आणि सकारात्मकता वाढते, असं मानलं जातं.
तिसरी वस्तू म्हणजे तुळशीचं रोप. ज्यांच्या घरी तुळस नाही, त्यांनी राधाअष्टमीच्या दिवशी ती घरी आणावी, असं सांगितलं जातं. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
चौथी गोष्ट म्हणजे गुलाल. राधाअष्टमीच्या दिवशी राधा राणीला गुलाल अर्पण करणं शुभ मानलं जातं. यामुळे राधा राणीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात प्रेम, आनंद आणि सुख येतं, अशी श्रद्धा आहे.
पाचवी आणि शेवटची वस्तू म्हणजे पैंजण. मोराची पिसं कोरलेले चांदीचे पैंजण किंवा पायातल्या अंगठ्या राधाअष्टमीला खरेदी करणं शुभ मानलं जातं. पूजेच्या वेळी ते राधा राणीच्या चरणांना स्पर्श करून विवाहित स्त्रीला भेट द्यावेत किंवा स्वतः घालावेत. यामुळे सौभाग्य आणि वैवाहिक सुख मिळतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
टीप - धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई अशा विषयांवरील ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिलेली आहे. याबाबत कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.