माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल यांची इन्स्टाग्राम पेड सबस्क्रिप्शनमधून महिन्याला लाखोंची कमाई
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी इन्स्टाग्रामवर पेड सबस्क्रिप्शन सुरू केल्यापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
भारतीय लष्कराचे माजी अधिकारी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर सुरू केलेले पेड सबस्क्रिप्शन मॉडेल. या मॉडेलच्या माध्यमातून ते त्यांच्या फॉलोअर्सकडून दरमहा ठराविक फी घेत आहेत.
ऋषभ सिंह संब्याल यांना इन्स्टाग्रामवर अंदाजे २३ लाख युजर्स फॉलो करतात. यापैकी ३,०९६ जणांनी त्यांचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी ही फी दरमहा १८० रुपये तर आयफोन युजर्ससाठी दरमहा १९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यावरून त्यांची मासिक कमाई लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काही लोक याकडे सैन्याच्या नोकरीनंतरचा नवा करिअर पर्याय म्हणून पाहत आहेत, तर काहीजण लष्करी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने पैसे आकारण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी भारतीय सैन्यात सुमारे १२ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी जाट रेजिमेंटमध्ये काम केले असून ४ पॅरा स्पेशल फोर्सेससाठीही वॉलंटियर केले होते. देशाच्या सर्वोच्च पदावरील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी म्हणून ते जेव्हा अधिकृत कार्यक्रमांत दिसले, तेव्हापासून लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते झाले. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की अनेक युजर्स त्यांना नॅशनल क्रश असेही म्हणू लागले.
ऑगस्ट २०२६ मध्ये वेळेआधीच सैन्याच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी डिजिटल कन्टेन्ट क्रिएशनच्या क्षेत्रात पाऊल टाकले. सैन्यात असताना त्यांचे फिटनेस, आर्मी लाईफ आणि संघर्षाशी संबंधित रील्स लाखो लोकांना आवडले होते. हीच मोठी फॅन फॉलोइंग आता त्यांनी मॉनेटाइज करण्याचा मार्ग निवडला आहे, त्यामुळेच सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच ते राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्येही दिसले होते, जिथे त्यांनी एडीसी पदाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.
इन्स्टाग्रामवर पेड सबस्क्रिप्शन सुरू केल्यापासून ऋषभ सिंह संब्याल यांच्या महसुलाचा अंदाज लावला जात आहे. प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार आणि थर्ड-पार्टी अॅनालिटिक्सच्या माहितीनुसार सध्या त्यांच्याकडे ३,०९६ सक्रिय सबस्क्राइबर्स आहेत. प्लॅटफॉर्मचा कर आणि कपात वजा करण्यापूर्वी त्यांची प्राथमिक मासिक कमाई सुमारे ५.९७ लाख ते ६.०६ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सबस्क्रिप्शन घेणाऱ्या फॉलोअर्सना एक्सक्लुझिव्ह पोस्ट, रील्स, सिक्रेट अपडेट्स आणि थेट संवाद साधण्याची संधी मिळते.
एक माजी आर्मी ऑफिसर आपले रील्स आणि पोस्ट पाहण्यासाठी पैसे घेत असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांच्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी याला सैन्याच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे सांगत डाऊनग्रेड ठरवले. देशासाठी युनिफॉर्म परिधान करणाऱ्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे व्यावसायिक होऊ नये, असे काहींचे म्हणणे आहे. तर समर्थकांच्या मते सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाप्रमाणे त्यांनाही स्वतःची उपजीविका चालवण्याचा आणि नवीन करिअर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.