जुन्या वैरातून नागपुरात तरुणाच्या छातीत चाकू खुपसला, चार आरोपींना अटक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
यशोधरानगर भागातील वनदेवीनगरमध्ये रूपेश शिर्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
नागपुरात जुन्या वैरातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यशोधरानगर भागातील वनदेवीनगर येथे आरोपींनी आधी या तरुणाला घराबाहेर बोलावले. त्यानंतर घराच्या मागच्या बाजूला नेऊन चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली आणि त्यातल्या एका आरोपीने त्याच्या छातीत चाकू खुपसला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.
ही घटना 31 ऑक्टोबरची आहे. यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी जुनी वस्ती भागातील वनदेवीनगरमध्ये रूपेश शिर्के राहतात. ते गुलशननगर रेल्वे रुळाच्या परिसरातून गायी-म्हशी चारून आपल्या घरी परतले होते. नेमक्या त्याच वेळी आरोपी मयूर साखरे आपल्या तीन साथीदारांसह तिथे पोहोचला.
आरोपींनी रूपेश यांना घराबाहेर बोलावले आणि त्यांच्याशी वाद सुरू केला. त्यानंतर चारही आरोपी त्यांना घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेले. तिथे त्यांनी लाथाबुक्क्यांनी रूपेश यांना बेदम मारायला सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच एका आरोपीने चाकू काढला आणि रूपेश यांच्या छातीवर वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात धावपळ उडाली.
रूपेश यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत चारही आरोपी तिथून पळून गेले होते. रक्ताने माखलेल्या रूपेश यांना तातडीने राणी दुर्गावती चौकातील अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की सुमारे महिनाभरापूर्वी रूपेश आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्याच जुन्या वैरातून आरोपींनी हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
या प्रकरणाची तक्रार मिळताच यशोधरानगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अमन साहू, मयूर साखरे, राहुल बालबुधे आणि मोहम्मद कलीम मोहम्मद आरिफ अन्सारी या चौघांना अटक केली आहे. रूपेश यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.