फ्लॅटमधल्या दिवाळीत रांगोळीचा नवा ट्रेंड, पुण्यात वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पारंपरिक रंगांच्या रांगोळीबरोबरच पुण्याच्या बाजारात वुडन, वुलन, मॅट आणि आर्टिफिशियल रांगोळीचे पर्याय आले आहेत. कमी जागा आणि कमी वेळ लक्षात घेऊन महिला त्यांना पसंती देत आहेत.
दिवाळी म्हटली की घरासमोर आकर्षक रांगोळी आणि त्याभोवती सजवलेल्या पणत्या, हे चित्र हमखास पाहायला मिळते. पण जीवनशैली बदलत चालली आहे, तशी रांगोळीचे स्वरूपही बदलत आहे. पारंपरिक रंगांच्या रांगोळीबरोबरच पुण्याच्या बाजारात आता वुडन, वुलन, मॅट आणि आर्टिफिशियल रांगोळीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.
फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांकडे जागा कमी असते आणि वेळेचीही मर्यादा असते. हे लक्षात घेऊन महिला या नव्या पर्यायांना पसंती देत आहेत. फ्लॅट संस्कृतीत स्टिकर आणि आर्टिफिशियल रांगोळीचे आकर्षण आहे, तर नव्या डिझाईन्सनाही बाजारात मागणी आहे.
वुडन रांगोळी लाकडापासून बनवलेल्या नक्षीदार साच्यांमध्ये रंग भरून तयार केली जाते. ती जमिनीवर काढावी लागत नाही आणि चिकटवावीही लागत नाही. एका जागेवरून दुसरीकडे सहज हलवता येत असल्याने घराच्या प्रवेशद्वारासह कुठेही ठेवता येते. गोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत ती मिळते आणि सध्या ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
ज्यांना रांगोळी काढण्याची कला जमत नाही, अशा महिलांसाठी मॅट रांगोळी उपयोगी पडत आहे. ती सुट्या भागांमध्ये मिळते आणि पॅकिंगवरील नमुन्यानुसार मांडायची असते. विशेष म्हणजे ती पुन्हा वापरता येते. सणाच्या काळात साफसफाई आणि सजावटीची कामे सांभाळावी लागतात, अशा वेळी त्यामुळे महिलांचा वेळ वाचतो.
वुलन रांगोळी लोकरीच्या आणि रेशमी धाग्यांपासून बनवलेली असते. यंदा तिनेही विशेष लक्ष वेधले आहे. वेगवेगळ्या फुलांच्या आकारांतील आणि फ्लोरोसंट रंगांतील डिझाईन्समुळे घराला आकर्षक लूक मिळतो. ही रांगोळी धुता येते, त्यामुळे ती पुन्हा वापरता येते. घराचे कोपरे, पायऱ्या आणि भिंतींच्या कडेला तिची सजावट करता येते.
बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्सही मिळत आहेत. त्याचबरोबर नक्षीदार छाप उमटवणाऱ्या रांगोळीसाठी चाळण्याही उपलब्ध आहेत. या चाळण्यांचे दर साधारण १० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. कमी वेळात आकर्षक सजावट करण्यासाठी महिला या पर्यायांचा वापर करत आहेत.
दिवाळीत या रांगोळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. वुलन रांगोळी तयार करणाऱ्या शिवानी पठारे म्हणतात, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कमी वेळात घराची आकर्षक सजावट करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. तसेच, घरी राहणाऱ्या महिलांनाही अशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करून विकण्याची संधी आहे. त्यातून त्या घरबसल्या छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात, असे पठारे यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.