पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, पारा ३१ अंशांवर
पुण्यात सोमवारी पाऊस पडल्यानंतर मंगळवारी त्याने पुन्हा विश्रांती घेतली. दुपारनंतर उन्हाचा चटका वाढल्याने उकाडाही वाढला आहे.
पुणे शहरात सोमवारी पावसाने हजेरी लावली होती, पण मंगळवारी त्याने पुन्हा विश्रांती घेतली. मंगळवारी सकाळी आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारनंतर मात्र ढग दूर झाले आणि उन्हाचा चटका वाढला. त्यामुळे शहरातील उकाड्यातही वाढ झाली.
मंगळवारी शहरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यातच बुधवारी (३०) तापमानाचा पारा ३१ अंशांवर पोहोचला असून पुन्हा उकाडा जाणवत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणातील उकाडा वाढल्याचे पुणेकरांना जाणवत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कमी आहे. तापमानात काहीशी वाढ होण्याचाही अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने कमाल आणि किमान, अशा दोन्ही तापमानांत वाढ होऊ शकते.
बुधवारी सकाळी शहरात आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज आहे. त्याच दिवशी दुपारनंतर आणि सायंकाळी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून शहराच्या काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. बुधवारी कमाल तापमान ३३ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र सध्या पुण्यातील तापमानाचा पारा ३१ अंशांवर गेल्याचे दिसून आले आहे.
गुरुवारी (१) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आणि सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. त्यानंतरही पावसाची शक्यता कमी राहणार असल्याने शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
अकोल्यातही अशीच स्थिती आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात आणि पातूर तालुक्यात नागरिकांना सध्या तीव्र उन्हाचा चटका आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. आकाशात अधूनमधून ढग दाटून येतात, पण पाऊस पडण्याऐवजी उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना 'ऑक्टोबर हीट'चा दाहक अनुभव येत आहे.