शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पुण्याचा सार्थक चव्हाण चेन्नईत ट्रॅकवर उतरणार, १ नोव्हेंबरला रंगणार एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज

पुण्याचा सार्थक चव्हाण चेन्नईत ट्रॅकवर उतरणार, १ नोव्हेंबरला रंगणार एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

पुण्याचा १९ वर्षांचा सार्थक चव्हाण पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघाकडून मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

पुण्याचा १९ वर्षांचा सार्थक चव्हाण आता चेन्नईत ट्रॅकवर उतरणार आहे. मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर होणाऱ्या 'एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज' २डब्ल्यु-२०२६ या स्पर्धेत तो पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघाकडून सहभागी होणार आहे. ही स्पर्धा चेन्नई येथे रविवारी, १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

याच स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत, सप्टेंबरमध्ये झालेल्या शर्यतीत, सार्थकने 'सुपर स्पोर्ट ३०१-४००सीसी ओपन' या प्रमुख गटात सलग दोन विजय मिळवले आणि दुहेरी मुकूट पटकावला होता. एवढेच नाही, तर पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या 'इलेक्ट्रिक आरटीई' गटातही तो अव्वल क्रमांकावर राहिला आणि त्याने तिहेरी मुकूट आपल्या नावावर केला.

लढतीआधी बोलताना सार्थक म्हणाला की, आधीच्या फेरीतील विजेतेपदामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. मला पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करायची आहे, पण त्याचे मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही. माझ्या कामगिरीबद्दल मी खूपच समाधानी आहे. मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्त्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे, असेही तो म्हणाला.

सार्थक प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याचबरोबर फिटनेस कोच मिहीर तेरणीकर यांचेही मार्गदर्शन त्याला मिळत आहे.

सार्थकची याआधीची कामगिरीही लक्षवेधी आहे. एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या 'टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप' या श्रेणीत मलेशियातील मोसमाच्या पहिल्याच फेरीत तो 'पोडीयम विजेता' ठरला होता. त्यानंतर मे महिन्यात थायलंडमधील बुरिराम येथील 'चांग इंटरनॅशनल सर्किट' येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तो विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरला होता. आपल्या कामगिरीने त्याने तो दावा 'सार्थ' करून दाखवला होता.

मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या 'एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज' स्पर्धेत पुण्याच्या १९ वर्षांच्या सार्थकने धडाकेबाज कामगिरी करत 'सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी' गटाचे विजेतेपद पटकावले होते. पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग संघाकडून उतरलेल्या सार्थकने शेवटच्या फेरीत धाडसी चाली करत नाट्यमय विजय मिळवला. १६ ऑगस्टला झालेल्या सहा फेऱ्यांच्या शर्यतीत तो बहुतांश वेळ तिसऱ्या स्थानावर होता. त्याच्यासमोर बंगळुरूचा सहकारी चिरंत विश्वनाथ आणि हैदराबादचा राहिल पिल्लारीसेट्टी होते. अखेरच्या फेरीत सार्थकने या दोघांनाही मागे टाकत आघाडी घेतली होती.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ